News

सांगली: पूरबाधित नागरिकांना जेवण, इतर मुलभूत सुविधा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्याने लोक आपापल्या घरी परतत आहेत.

Updated on 13 August, 2019 7:51 AM IST


सांगली
: पूरबाधित नागरिकांना जेवण, इतर मुलभूत सुविधा तसेच पशुधनासाठी चाऱ्याची जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत स्वीकृती केंद्रात राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्याने लोक आपापल्या घरी परतत आहेत. ज्या संस्था, व्यक्तिंना मदत द्यावयाची आहे, त्यांनी सदरची मदत एका कुटुंबाला एक संसारोपयोगी साहित्याचे किट याप्रमाणे बनवून द्यावी. यामध्ये भांडी, काही धान्य, स्वच्छतेचे साहित्य,शैक्षणिक गरजेच्या वस्तू अशा प्रकारांच्या समावेश असावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, खानापूर, तासगाव तालुक्यातून जिल्ह्याबाहेरून लातूर, वाई, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सातारा, शिर्डी, जालना, पनवेल या ठिकाणाहून पूरबाधितांसाठी मदत येत आहे. यामध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, मिरज यांच्याकडून भोजन व चारा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवा संघ यांच्याकडून भोजन सेवा व स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डी. के. टी. ट्रस्ट, विटा यांच्याकडून एक हजार लोकांचे जेवण, विठ्ठल रूक्मिणी देवस्थानकडून 20 हजार लाडू आणि 5 हजार साड्या पाठवण्यात आल्या आहेत. 

इस्लामपूर दूध संघाकडून बिस्लेरी कंपनीचे 5 हजार पाणी बॉक्स, विभागीय आयुक्त पुणे कार्यालयाकडून मिनरल वॉटरच्या अडीच हजार बाटल्या, श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ (अक्कलकोट) यांच्याकडून 800 पाणी बॉक्स व इतर साहित्य, दत्ताश्रम (जालना) यांच्याकडून 1 हजार 700 लोकांचे जेवण मदत स्वरूपात प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल ह्युमन राईटस् (औरंगाबाद), भारतीय जैन अल्पसंख्याक समाज (सोलापूर), इंडियन ऑईल, चितळे डेअरी फार्म, शिवाजीराव भगवानराव जाधव बागेश्वरी कारखाना वरफळ (ता. परनूर, जि. जालना) यांच्याकडून पाणी बॉक्स, सुके खाद्यपदार्थ, धान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू या स्वरूपात मदत प्राप्त होत आहे.

या मदतीचे मागणीप्रमाणे गरजूंना वाटप होत आहे. दि. 12 ऑगस्ट रोजी इस्लामपूरला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक कपडे, पलूसला 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पशुखाद्य, मिरजला 3 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 3 ट्रक पाणी आणि महानगरपालिका हद्दीत 5 ट्रक जीवनोपयोगी वस्तु आणि 1 ट्रक पाणी यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, शासकीय रूग्णालयासाठी 1 हजार पाणी बॉक्स आणि औषधे पाठवण्यात आली आहेत.

English Summary: Floods victim daily use materials and food kit should be given in the form of help
Published on: 13 August 2019, 07:49 IST