रत्नागिरी : कोरोना व्हायरसमुळे चीनसह जगभरातील व्यापारावर संकट आले आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली हा देश पूर्णपणे ठप्प झाला आहे. जगात थैमान घातलेल्या या आजाराने भारतात आपले पाय पसरवले आहेत. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५० झाली आहे. तर महाराष्ट्रात पाच जण या आजाराने ग्रस्त आहेत. या व्हायरसमुळे जगातील अनेक व्यापार ठप्प पडत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या व्हायरसविषयी जनजागृती केली जात आहे. परंतु अफवेमुळे चिकन आणि पोल्ट्रीसारख्या उद्योगाला फटका बसला आहे. आता या व्हायसरचा फटका आता मासे निर्यातीला बसत आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनमधील निर्यातीवर मोठा परिणाम होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फ्रोजन माशांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुंबई वगळता कोकणातून १५ ते १६ हजार टन तर संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ६० हजार टन माशांची निर्यात होते. महाष्ट्रातून बांगडा, सुरमई, बळा, म्हाकूळ आणि कोळंबी या माशांची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते. कोरोना व्हायरसमुळे दोन महिन्यांनी ३० टक्के निर्यात घटेल, असा अंदाज रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्स्पोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जून गद्रे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
कोरोना टाळण्यासाठी समुद्री पदार्थ (सी फुड) खाऊ नयेत, अशा सुचना दिल्या जात आहेत. कोरोनाचे व्हायरस कोठूनही येऊ शकतात. त्यामुळे सध्या सावधानगी बाळगली जात आहे. त्यामुळे माशांचे रेडी टू इटसारख्या पदार्थांच्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. जपान, अमेरिका, इटली आणि युरोप देशात राणी माशापासून बनविण्यात आलेल्या सुरमीला मोठी मागणी असते. एका वर्षात जपानला २० हजार टन, इटलीला ६५०० टन, अमेरिकेला ५ हजार टन फ्रोजन माशांची निर्यात होत असते.
Published on: 11 March 2020, 02:48 IST