पुणे : गेल्या काही दिवसांपासून मत्सशेतीचे महत्व वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह, अनेक व्यवसायिक व्यक्ती, संस्था याकडे वळत आहे. आदिवासी समाजासाठी मत्सशेती उदरनिर्वाहाचा एक उत्तम पर्याय आहे, असे मत केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचे विस्तार प्रमुख डॉ. एस. एन. ओझा यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था आणि नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजनेअंतर्गत एकदिवसीय मत्स्य शेती, जनजागृती, सह-प्रदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. त्यावेळी ओझा यांनी मत व्यक्त केले. यावेळी डॉ. कपिल सुखधने, डॉ. शिवाजी अरगडे, डॉ. अंकुश कांबळे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, धनेश पडवळ, डॉ. करण रामटेके यांच्यासह ११० आदिवासी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ओझा म्हणाले की, तळागाळातील सर्व आदिवासी समाजासाठी उदरनिर्वाहाचा स्रोत म्हणून मत्स्यपालनास प्रोत्साहित करणे व मत्स्यशेती वाढीस लागणे या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील आदिवासी समाजाला गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, त्यासाठी योग्य जातींची निवड, शेततळ्याची निर्मिती व काळजी, माशांचे खाद्य व्यवस्थापन तसेच त्या संदर्भातील विविध योजना आहेत.कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे म्हणाले की, मत्स्य शेतीकरिता कृषी विज्ञान केंद्र विविध उपक्रम राबवित आहे.
यावर्षी पासून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मस्त्यबीज निर्मिती करून उत्तम प्रतीचे मस्त्यबीज पुरवठा केला जाईल. त्याचा फायदा आदिवासी शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच आर्थिक वाढ होण्यास मदत होईल. तर डॉ. शिवाजी अरगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. अंकुश कांबळे यांनी आभार मानले.
Published on: 27 March 2021, 11:04 IST