News

शोभिवंत मासे हे “जिवंत रत्ने” आहेत. हल्ली प्रत्येकाच्या घरात मत्स्यालय ठेवले जाते. मत्स्यालय ठेवण ही प्रत्येकाच्या छंदानुसार व आवडीनुसार केली जाते. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच आपण त्याची काळजी घेतो. जसे कि टाकीची ची साफसफाई करणे, माशांना वेळेवर खाद्य देणे ,पाणी बदलणे इत्यादी.

Updated on 25 September, 2023 2:12 PM IST

महेश शेटकार, जयंता टिपले

शोभिवंत मासे हे “जिवंत रत्ने” आहेत. हल्ली प्रत्येकाच्या घरात मत्स्यालय ठेवले जाते. मत्स्यालय ठेवण ही प्रत्येकाच्या छंदानुसार व आवडीनुसार केली जाते. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच आपण त्याची काळजी घेतो. जसे कि टाकीची ची साफसफाई करणे, माशांना वेळेवर खाद्य देणे ,पाणी बदलणे इत्यादी. या सर्व बाबीं बरोबर माशांचे आरोग्य व्यवस्थापन तितकेच महत्वाचे असते. कारण उपचार करत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे नेहमी फायदेशीर ठरते.

 मासळीला आजार होऊ नये म्हणून:
• पाण्याची गुणवत्ता राखणे. उदा. तापमान, सामू व प्राणवायू
• समतोल आणि सकस आहार देणे.
• मुख्यतः जिवंत खाद्य समाविष्ट करणे.
• पाण्यातील घाण वेळीच काढून टाकणे. उदा. विष्ठा , मेलेले मासे व वनस्पती
• माशांची वारंवार हाताळणी टाळणे.
• सुसंगत प्रजातींना एकत्रित ठेवणे.
• दररोज मस्त्यालयातील माशांची हालचाल पाहणे.

 मासे आजारी असल्याची लक्षणे:
खवले गळून पडणे, शरीराची वाढ खुटणे, पाण्यात बुडबुडे तयार होणे, मासे पृष्ठभागावर पोहताना आढळणे, हालचाल मंदावणे (संथ गती) , खाद्य खाण्याचे प्रमाण बदलणे, परांची हालचाल न होणे, पोहण्याची पद्धत बदलणे, शरीरावर दुखापत दिसून येणे.

 मासे आजारी पडण्याची मुख्य कारणे
• मत्स्यालयातील पाण्याची गुणवत्ता ढासळणे.
• तापमान कमी जास्त झाल्यामुळे.
• खराब झालेले खाद्य सेवन केल्यामुळे.

 आरोग्य व्यवस्थापनासाठी इष्टतम पाण्याच्या गुणवत्तेचे निकष:
• प्राणवायू - ४ ते ८ पीपीएम
• सामू – ७
• तापमान - २१ ते ३० अंश सेल्सिअस

 शोभिवंत माशांना होणारे प्रमुख आजार व त्यावरील उपाय:

 इच किंवा व्हाईट स्पॉट
• लक्षणे-
शरीरावर सुईच्या टोकाच्या आकाराचे पांढरे ठीपके दिसतात. प्रादुर्भावामुळे कल्ल्यांची व शरीराची हालचाल वाढते.
• कारणे-
नवीन मासा संपर्कात आल्यामुळे व पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे हा आजार उद्भवतो.
• उपाय-
 आठ ते दहा थेंब मिथिलिन ब्लू मत्स्यालयात टाकावे.
 दर तीन दिवसांनी मासळीची हालचाल पहावी.
 हिटर चा वापर करून पाण्याचे तापमान वाढवावे (२८-३० अंश सेल्सिअस).
 मत्स्यालयातील वनस्पती काढून टाकाव्यात.
 १.५ ग्राम प्रति लिटर मीठाचा वापर करावा.

 अल्सर
• लक्षणे-
 ऐरोमोनास व सुडोमोनास या जिवाणूंमुळे हा रोग दिसून येतो.
 डोक्याकडील आणि पराकडील भागात लालसर डाग दिसून येतात.
 मासळी खाद्य खाणे सोडते.
 हालचालीतील गती मंदावते.
• कारणे-
तापमानात झालेल्या अचानक बदलामुळे शरीरावर गाठी
येतात.
• उपाय-
१.५ ग्राम प्रति लिटर मीठाचा वापर करावा दररोज व ५०% पाणी बदलणे

 फिन व टेल रॉट
• कारणे-
पाण्याची गुणवत्ता खराब झाल्याने, जिवाणू वाढतात त्यामुळे हा रोग उद्भवतो.
• लक्षणे-
मासळीची सुंदर पंखव व शेपटी हि झडल्यासारखी व कुरतडल्यासारखी दिसते. स्वभावात सुस्ती येते.
• उपाय-
 दर बारा तासांनी आयोडीन द्रावणाचा वापर करावा (डोळे सोडून).
 कॉपर सल्फेट च्या द्रावणात १-२ मिनिटांकरीता मासळीला बुडवावे.

 बुरशी येणे
• कारणे-
पाण्याची गुणवत्ता खराब झाल्यास, वारंवार ची हाताळणी तसेच माशांतील आपापसातील भांडणे यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
• लक्षणे-
शरीरावर, पायावर पांढरी कापसासारखी वाढ दिसून येते. हालचाल मंदावते व कल्ले पिवळे होऊन
गळून पडतात.
• उपाय-
 एक ते दोन चमचे मीठ प्रति लिटर पाण्यात टाकावे.
 कॉपर सल्फेट ०.१ मिली प्रति लिटर ( १० ते १५ मिनिटे अंघोळ घालावी).
 आठ ते दहा थेंब मिथिलिन ब्लू मत्स्यालयात टाकावे.

 अँकर वर्म
• कारणे-
हा संसर्गजन्य आजार असून लर्निया या (lernea) परजीवामुळे होतो.
• लक्षणे-
 शरीरावर धाग्या सारखे छोटेसे परजीवी दिसून येतात.
 प्रादुर्भाव झालेली जागा लाल होते व सुजते.
 मासे वारंवार काचेला घासतात.
• उपाय-
 शरीरावर असलेल्या परजीवी हळुवार चिमट्याच्या साह्याने काढाव्यात.
 मीठ १-२ ग्राम प्रति लिटर.
 १ ते २ टक्याचे पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणात मासळी ५ मिनिटे बुडवून काढावी.

 अरगुलस
• कारणे-
हा संसर्गजन्य आजार असून परजीवामुळे होतो.
• लक्षणे-
 शरीरावर ही परजीवी चिटकून बसते आणि जखम करते.
 प्रादुर्भाव झालेली जागा लाल होते व सुजते.
 माशांची हालचाल कमी दिसून येते व मासे खाद्य खात नाही.
• उपाय-
 शरीरावर असलेल्या परजीवी हळुवार चिमट्याच्या साह्याने काढाव्यात.
 मीठ १-२ ग्राम प्रति लिटर.
 १ ते २ टक्याचे पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणात मासळी ५ मिनिटे बुडवून काढावी.


महेश भागवत शेटकार विद्यार्थी (M.F.Sc.) मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिर, मो. न. ७४४८००३२११.
जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र

English Summary: Fish Health Management Update article
Published on: 25 September 2023, 02:12 IST