News

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी तसेच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. या हंगामात देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संकटांची मालिका कायमच आहे. अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल बदलामुळे या हंगामात द्राक्षांच्या बागांना मोठा फटका बसला आहे.

Updated on 29 March, 2022 2:47 PM IST

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी तसेच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. या हंगामात देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संकटांची मालिका कायमच आहे. अवकाळी पाऊस व हवामानातील प्रतिकूल बदलामुळे या हंगामात द्राक्षांच्या बागांना मोठा फटका बसला आहे.

यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट होत असल्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा दावा आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. सांगली जिल्ह्यातही द्राक्ष उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. मात्र सांगलीत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट बघायला मिळाले होते.

अवकाळी तसेच वाढत्या उन्हामुळे द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम होतं आहे. याच कारण पुढे करत द्राक्षे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता द्राक्षे खरेदी थांबवली आहे. द्राक्षे खरेदी करणारे व्यापारी सांगतात की, बदलत्या हवामानामुळे द्राक्षाचा दर्जा हा खुपच खालवला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर द्राक्षांच्या बागा नांगरण्याची वेळ आली आहे. सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी बंद केल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे.

बाजारपेठेतील गणितानुसार, शेतमालाचे उत्पादन कमी झाले की, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असतो. मात्र द्राक्षाच्या बाबतीत याउलट घडतांना बाजारपेठेत बघायला मिळत आहे. द्राक्षाचे उत्पादन कमी असताना देखील हंगामाच्या सुरवातीपासूनच द्राक्षाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मध्यंतरी उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवू लागल्यामुळे द्राक्षाच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची आशा होती.

मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा फोल ठरवल्या. अजूनही अनेक शेतकऱ्यांची द्राक्षाची काढणी राहिलेली आहे. तासगाव तालुक्यात अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेत अवकाळी पावसाचे पाणी बघायला मिळत आहे. यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्षाची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे. त्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फायदा झाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची अद्याप काढणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या अवकाळी चा मोठा फटका बसला आहे.

यावर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे अतिरिक्त औषधांची फवारणी करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. परंतु आता द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक बागायतदारांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादन वाढीच्या अनुषंगाने केलेला द्राक्ष लागवडीचा प्रयोग आता फसू लागला आहे की काय? असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत.

वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी सावध पवित्रा अंगीकारत द्राक्षाची खरेदी थांबवत आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्ष साखर कमी प्रमाणात उतरत असते यामुळे द्राक्षाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो त्यामुळे द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी अवकाळी पावसाचा बहाणा पुढे करत द्राक्षे खरेदी थांबवत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी बांधव आरोप करीत आहेत की, व्यापारी रेट कमी करण्यासाठी वातावरणातील बदलाचे निमित्त पुढे करीत आहेत. कारण कुठले का असेना परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकरी बांधवांना केवळ उत्पादनात घट देत नसून यामुळे शेतमाल विक्रीसाठी देखील अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या:-

शेतकरी मित्रांनो, काजु लागवड कसं आपल्याला लखपती बनवू शकत, वाचा याविषयी…..

अच्छे दिन आ गए रे….! कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव

English Summary: Find out what happened when grapes suddenly stopped buying
Published on: 29 March 2022, 02:47 IST