Rain Update : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवास सुरु झाल्याने राज्यात मागील दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातूनही १० ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा देशात सरासरी ९४ टक्के तर राज्यात ९७ टक्के पावसाने हजेरी लावली आहे. काही भागात चांगला पाऊस असला तरी काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तसंच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट
राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊसाची तूट झाली आहे. यात सांगलीत सरासरीच्या फक्त ५६ टक्के पावसाची नोंद झाली. साताऱ्यात देखील सरासरीच्या ६२ टक्के पावसाची नोंद, सोलापुरात ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. यात बीडमध्ये सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद, संभाजीनगरात ८७ टक्के, धाराशिवमध्ये सरासरीच्या ७१ टक्के पावसाची नोंद, जालन्यात सरासरीच्या फक्त ६७ टक्के पाऊस, हिंगोलीत सरासरीच्या ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील दोन जिल्ह्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. अकोल्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस तर अमरावती जिल्ह्यात ७३ टक्के पावसाची नोंद झाली.
राज्याच्या कोणत्या भागात किती पाऊस?
कोकणात ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात ८७ टक्के पाऊस, मराठवाड्यात देखील ८७ टक्के पाऊस आणि विदर्भात ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच परतीच्या मान्सूनने देखील परतण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परतीचा पाऊस तरी चांगला व्हावा,अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
Published on: 02 October 2023, 10:34 IST