Mumbai News : शिवाजी पार्कवर यंदाही दसऱ्या मेळाव्याची तोफ ठाकरेंची धडाडणार आहे. मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कवर ठाकरेंना दसऱ्या मेळाव्याची परवानगी दिली आहे. मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? याबाबत वाद सुरु होता. अखेर महानगरपालिकेने दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंना परवानगी देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. या अर्जाची दखल घेत मुंबई महापाहिकेने ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबरला ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार आहे.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता. अखेर आज महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.
दरम्यान, दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा पहिल्यापासूनची आहे. मागच्या अनेक वर्षात ही परंपरा मोडलेली नाही. मात्र मागील वर्षी शिवसेनेत दोन गट पडले. यामुळे दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. त्यानंतर शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. पण त्यांना त्याठिकाणी परवानगी मिळाली नाही. म्हणून शिंदे गटाने बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेतला. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता.
Published on: 12 October 2023, 01:04 IST