News

मुंबई: तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे 1,809 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Updated on 23 February, 2019 8:10 AM IST


मुंबई:
तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे 1,809 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष गौस महमंद लांडगे, नाशिक जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले, समन्वय महासंघाचे सदस्य तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

सातबारा संगणकीकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयाना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी 2 कोटी व अमरावती विभागासाठी 5 कोटी 13 लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तर उर्वरित विभागासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मंडल अधिकाऱ्यांसाठी सज्जास्तरावरील तलाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठविण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

श्री. पाटील म्हणाले, राज्यातील 80 टक्के तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले आहेत. उर्वरित तलाठ्यांना लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मंडल अधिकारी, अव्वल कारकून यांची अदलाबदलीने पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येईल व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

English Summary: Fill up 1,800 vacant posts of talathi soon
Published on: 23 February 2019, 08:08 IST