News

नासिक म्हटलं की समोर द्राक्षाचे आणि कांद्याचे चित्र उभे राहते. नाशिक जिल्हा द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात आहे तर हा जिल्हा कांद्यासाठी देखील विशेष प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा चांदवड येवला तसेच सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. या रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड या तालुक्यात झाल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्यावर अवकाळी नंतर आता एक मानवनिर्मित संकट उभे झाले आहे.

Updated on 01 February, 2022 10:47 PM IST

नासिक म्हटलं की समोर द्राक्षाचे आणि कांद्याचे चित्र उभे राहते. नाशिक जिल्हा द्राक्षे पंढरी म्हणून विख्यात आहे तर हा जिल्हा कांद्यासाठी देखील विशेष प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा चांदवड येवला तसेच सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. या रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड या तालुक्यात झाल्याचे बघायला मिळाले आहे. परंतु रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्यावर अवकाळी नंतर आता एक मानवनिर्मित संकट उभे झाले आहे.

सिन्नर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात खत टंचाई निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा लागवड विशेष प्रभावित होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होत असल्याने खत टंचाईचा परिणाम हा सरळ कांद्याच्या उत्पादनावर होईल अशी भीती तालुक्यातील शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. तालुक्यात खत टंचाईची शेतकरी बांधव झळ सोसतच आहे, मात्र आता काही खत कंपन्या विक्रेत्यांना अनावश्यक खतांची खरेदी करण्यासाठी बळजबरी करत आहेत. याचा परिणाम म्हणून विक्रेते देखील शेतकऱ्यांना लिंकिंग पद्धतीने खत खरेदी करण्याची सक्ती करत आहेत. यामुळे तालुक्यात निर्माण झालेली खत टंचाई ही वास्तविक आहे की कृत्रिम पद्धतीने खतांची टंचाई केली जात आहे असा प्रश्न उभा झाला आहे. लिंकिंग प्रकारात शेतकऱ्यांना ज्या खताची आवश्‍यकता असते त्याच्या समवेतच दुसऱ्या एखाद्या खताची खरेदी करण्याची बळजबरी शेतकऱ्यांवर केली जाते. 'अमुक' खत घ्या तेव्हाच 'तमुक' खत मिळेल असा हा प्रकार आहे. मात्र हे पूर्णतः अनैतिक असून यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे बेजार झालेला बळीराजा खत कंपन्यांच्या या अनैतिक व्यवहारामुळे व बेकायदेशीर फर्मानामुळे देशोधडीला लागत असल्याचे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे.

तालुक्यात या खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याला पाणी पुरेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही मात्र असे असले तरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने विक्रमी कांदा लागवड केली आहे. अशातच कांदा पिक आता जोमाने वाढण्याच्या अवस्थेत असतानाच ही खत कंपन्यांची दादागिरी व निर्माण केलेली कृत्रिम खत टंचाई कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच महागात पडू शकते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी खतांच्या किमतीत अवाजवी वाढ करण्यात आली आहे त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करत जरी उत्पादन खर्चात वाढ झाली तरीदेखील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने कांदा पिकाची जोपासणीसाठी खतांची खरेदी करत आहे. 

वाढीव दरात का होईना शेतकरी राजा खतांच्या खरेदीसाठी तयार आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खत मिळेनासे झाले आहे. आणि ज्या ठिकाणी खत उपलब्ध आहे तिथे शेतकऱ्यांना अनावश्यक खतांची खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. खत कंपन्यांच्या या अनैतिक कृत्य मुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. तालुक्यातील या खत टंचाईमुळे व लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचा मायबाप सरकार वर मोठा रोष आहे, मायबाप सरकारने खत टंचाईकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर खतांचा साठा उपलब्ध करावा अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी शासनास घातली आहे.

English Summary: Fertilizer shortage in this taluka now! Farmer king bored due to scarcity of manure and linking
Published on: 01 February 2022, 10:47 IST