रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास वीस दिवस होत आलेत. या युद्धाचे आता हळूहळू विपरीत परिणाम देखील बघायला मिळत आहेत. या युद्धामुळे आधीच खाद्य तेलाच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आता या युद्धाचे पडसाद भारतातील कृषी क्षेत्रावर देखील उलटू लागले आहेत.
यामुळे आता खतांच्या किमती तसेच इंधन दरवाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कृषी तज्ञांच्या मते, रशिया आणि बेलारुस मधून भारतात मोठ्या प्रमाणात पोटॅश व फॉस्फरसची आयात केली जाते. हे दोन्ही घटक भारतात खत निर्मितीसाठी आवश्यक असतात. यामुळे आता कच्च्या मालाची आयात प्रभावित होणार आणि सहाजिकच खतांचे दर पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालतील.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रशिया आणि बेलारुस मधून आवश्यक खतांपैकी 15 टक्के खते आयात केले जातात. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे खतांची आयात प्रभावित झाली आहे आणि यामुळे भविष्यात खतांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया मोठ्या प्रमाणात जगात पोटॅशची निर्यात करत असतो भारतात देखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात पोटॅशची निर्यात होत असते.
खत तयार करण्यासाठी पोटॅश एक प्रमुख घटक असल्याने भविष्यात खतांच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारने खतांवर दिली जाणारे सबसिडी बंद केल्यामुळे देशांतर्गत खतांच्या किमती मोठ्या वाढल्या होत्या आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे खतांच्या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत या युद्धामुळे खाद्य तेलापासून तर इंधन आणि खतांच्या किमती प्रभावित होणार असल्याचा अंदाज आहे. या युद्धामुळे भविष्यात शेती करणे अजूनच महाग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात जवळपास 35 हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे, मात्र असे असले तरी भविष्यात खतांच्या किमती वाढल्यास विक्रेते चढ्या दराने खत विक्री करू शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आगामी खरीप हंगामासाठी आतापासूनच तयारी करत खतांचा साठा करून ठेवण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
»आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजाराचे विनातारण कर्ज
Published on: 16 March 2022, 06:58 IST