देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. महाराष्ट्र राज्य देशात सर्वात जास्त कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यांच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र हरियाणा राज्यात खूपच कमी क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते, म्हणून येथील सरकारने कांदा लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य सरकार द्वारे प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे कांद्याच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य तर मिळणारच आहे शिवाय बियाणे देखील सवलतीच्या दरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
हरियाणा सरकार राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात लावल्या जाणाऱ्या कांदा बियाण्यावर किलोमागे पाचशे रुपयांची सवलत देणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून राज्यातील शेतकरी कुठल्याही बियाणे केंद्रातून बियाणे खरेदी करून संबंधित योजनेचा लाभ उचलू शकतात. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आठ किलो कांदा बियाणे खरेदी करण्यास सवलत दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी एका हंगामासाठी सुमारे 44 हजार रुपयांची मदत सरकारकडून प्राप्त करू शकतो. मात्र यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
हरियाणा राज्यात एएफडीआर या कांद्याच्या सुधारित जातीच्या बियाणांची प्रति किलो किंमत 1950 रुपये एवढी असल्याचे शेतकरी सांगत आहेत, मात्र या योजनेद्वारे दिल्या जाणारा सवलतीचा फायदा घेऊन येथील शेतकरी 1450 रुपये प्रति किलोप्रमाणेकांदा बियाणे प्राप्त करू शकता. तसेच राज्यात एएफडीआर या जाती समवेतच मोठ्या प्रमाणात लावल्या जाणाऱ्या भीमा जातीच्या कांद्याचे बियाण्यांचे दर देखील याप्रमाणेच असतील. या योजनेअंतर्गत राज्यातील कर्नाल हिस्सार आणि मेवात या जिल्ह्यातील बियाणे केंद्रावरून कांद्याचे बियाणे सवलतीमध्ये प्राप्त केले जाऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व सवलतीत कांदा बियाणे प्राप्त करण्यासाठी, इच्छुक शेतकऱ्यांना स्वतःचा फोटो आणि ओळखपत्र तसेच पिकाचे नोंदणीपत्र तसेच इतर वैयक्तिक तपशील विक्री केंद्रावर जमा करावे लागणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधव जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांना भेटू शकतील. हरियाणा राज्यात कांदा लागवडीसाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये दिले जाणार आहेत.
हरियाणात राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाअंतर्गत येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कांदा लागवडीसाठी एकरी आठ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या अभियानांतर्गत जास्तीत जास्त पाच एकर क्षेत्रासाठी लाभ घेता येणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार असल्याचे समजत आहे. एकंदरीत चार हजार रुपये कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी सवलत दिली जाणार असून पाच एकर क्षेत्रासाठी 40 हजार रुपयाची मदत हरियाणा सरकार करणार आहे. म्हणजे येथील कांदा उत्पादक शेतकरी 44 हजार रुपये आर्थिक सहाय्य सरकारकडून प्राप्त करू शकतो.
Published on: 20 January 2022, 09:55 IST