शेतकरी कधी काय करतील याचा अंदाज नसतो. कधी ते आपल्या शेतात अनोखे प्रयोग करतात तर कधी ते विक्रमी उत्पादन घेतात. असे असताना आता एका शेतकऱ्याने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे ऊसतोड मजूर ईश्वर रामचंद्र सांगोलकर यांनी एकट्याने एका दिवसात २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडून विक्रम केला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. एकट्याने एवढा ऊस तोडने सोपे काम नाही. यामुळे वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार देखील केला आहे.
अनेक कुटूंब मिळून रोज चार ते पाच टन ऊस तोडतात, मात्र या शेतकऱ्याने सर्वांचे विक्रम मोडीत काढले आहेत. यामुळे ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ईश्वर सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात हा ऊस तोडणीचा विक्रम केला आहे. दिवसभरात केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी २० गुंठ्यातील १६ टन ऊस तोडला. त्यांचे वय देखील ५० आहे. या वयात देखील त्यांनी हे काम केले आहे.
वारणा कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस अधिकारी विजय कोळी शेती, गट अधिकारी अक्षय तोडकर, शेती मदतनीस प्रताप भोसले यांना याबाबत माहिती मिळाल्यावर यांनी ईश्वर सांगोलकर यांचा थेट उसाच्या फडात जाऊन सत्कार केला. यामुळे ते देखील भारावून गेले होते. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. वारणा साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसपुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा करार केला आहे.
या ट्रॅक्टरवर खैराव येथील ऊसतोड मजुरांची टोळी आहे. याच टोळीतील ईश्वर सांगोलकर यांचाही सहभाग आहे. सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात एकट्याने १६ टन ऊस तोडण्याचा विक्रम केला आहे. आजवरच्या इतिहासात असा पराक्रम कोणी केला नाही. ते दिवसभर ऊस तोडत होते. कारखान्यावर टनावर आणि अंतरावर ऊसतोड मजुरांना पैसे दिले जातात. असे असताना त्यांनी ही कामगिरी केली आहे. यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.
Published on: 15 January 2022, 11:00 IST