चंद्रपूर: खरिपाचा हंगाम तोंडावर असून बँकांमध्ये पोहोचून शेतकऱ्यांनी पीक कर्ज घ्यावे. राज्य शासनाने जवळपास सर्वच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबतचे निर्देश बँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधून कर्ज उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाभरातील बँक प्रतिनिधी कृषी विभाग व विविध महामंडळांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना अटी व शर्तीमध्ये न अडकवता पतपुरवठा करावा, असे आवाहन केले. या बैठकीला खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
राज्य शासनाने २०१९ मध्ये कर्जमाफी योजना केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांना दिल्या आहेत. कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे राहिले, असेल तरीही त्यांना कर्ज देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या १ एप्रिल पासून ३१ मे पर्यंत २७३.८२ लाख कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी शिखर बँकेचे समन्वयक एस.एन.झा यांनी दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, अण्णासाहेब साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ यांच्या मार्फत होणाऱ्या पतपुरवठ्याचाही आढावा घेतला. विविध क्षेत्रातील लोकांना अर्थपुरवठा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या या महामंडळाकडून राज्य शासनाला मोठी अपेक्षा असून त्यांनी योग्य प्रमाणात पतपुरवठा करावा, अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली. कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळात शेतकऱ्यांना पतपुरवठ्यामुळे पुढच्या हंगामाचे नियोजन करता आले नाही असे व्हायला नको. यासाठी सर्व अडथळे दूर करण्याबाबतची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
Published on: 03 June 2020, 07:48 IST