भारत कृषीप्रधान देश आहे, आणि बळीराजा या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जातो. बळी हा जरी राजा असला तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे व सुलतानी संकटांमुळे अनेकदा बळीराजा हताश झालेला नजरेस पडतो. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी राजा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा बळी होतांना नजरेस पडत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देखील असच काहीसं चित्र दिसत आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तुर पिकाला मोठा फटका बसला होता आता जिल्ह्यात सर्वत्र तूर काढणी मोठ्या जोरात सुरू आहे. सर्वत्र शेतकरी राजा तूर काढण्यासाठी व्यस्त आहे मात्र असे असले तरी तूर काढणी करताना अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना तूर पिकाच्या उत्पादनात मोठी झळ सोसावी लागली आहे, परिस्थिती एवढी बिकट आहे की काही शेतकऱ्यांना एका एकरात मात्र एक क्विंटल उत्पादन निघत आहे. म्हणजे सहा महिने तूर पिकासाठी अहोरात्र कष्ट करून शेतकरी राजांना एक एकर क्षेत्रातून सहा हजार रुपये प्राप्त झाले आहेत, या सहा हजार रुपये मधून उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरी एक कवडी देखील शिल्लक राहत नाही. याउलट काही शेतकऱ्यांना तर उत्पादन खर्च देखील निघत नाहीये.
बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन एक मुख्य पीक आहे, याबरोबरच जिल्ह्यातील अनेक भागात तूर पीक लागवडीला शेतकरी बांधव मोठी पसंती दर्शवित असतात. त्याप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड देखील केली गेली होती. मात्र माघारी जाणाऱ्या पावसानेच शेतकरी राजांना माघारी पाठवले आहे, खरीप हंगामात परतीच्या पावसाने तूर पिकाचे मोठे नुकसान केले होते. या अवेळी आलेल्या पावसामुळे तूर पिकावर अनेक रोगांचे सावट नजरेस पडत होते शिवाय यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव देखील लक्षणीय वाढला होता. त्याचा परिणाम सरळ उत्पादनावर आता दिसून येत आहे.
आता जिल्ह्यात तूर पिकाची काढणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रात फक्त एक क्विंटल उत्पादन प्राप्त होताना दिसत आहे. तूर पीक जवळपास सहा महिन्यात काढण्यासाठी तयार होते म्हणजे शेतकरी बांधवांना सहा महिन्यात सहा हजार रुपये पिकातून प्राप्त होतांना दिसत आहेत. त्यामुळे शेती हा एक जुगार आहे मिळाले तर लाखो रुपये मिळतील नाहीतर कवडी देखील मिळणार नाही असे जिल्ह्यातील शेतकरी खंत व्यक्त करत आहेत.
Published on: 18 January 2022, 03:52 IST