खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते यामुळे खरीप हंगामातील लाल कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. उत्पादनात घट तर झालीचं मात्र आता उन्हाळी कांदा बाजारपेठेत दाखल होऊ लागल्याने कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण बघायला मिळत आहे.
सध्या बाजारपेठेत लाल कांदा समवेतच उन्हाळी हंगामातील उन्हाळी कांदा देखील दाखल होऊ लागला आहे यामुळे सोलापूर बाजार पेठमध्ये आवक वाढली असून कांद्याचे दर कमी झाले आहेत. आधीच कमी दर असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक भुर्दंड सहन करत होता, आणि अशातच सोलापूर बाजारपेठेत 9 व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या 9 व्यापाऱ्यांकडे परवाना नव्हता तरीदेखील त्यांनी कांद्याची खरेदी केली, अनधिकृतपणे कांद्याची खरेदी केली तर केली वेळेवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला देखील दिला नाही. यामुळे आपल्या पारदर्शी व्यवहारामुळे संपूर्ण राज्यात ओळखली जाणारी सोलापूर बाजार पेठ कलंकित झाल्याच्या भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत एवढेच नाही सर यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे देखील अडकलेले आहेत.
या संदर्भात शेतकर्यांनी संबंधित व्यापाऱ्यांविरोधात बाजार समिती प्रशासनाकडे रितसर तक्रार देखील नोंदविली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी विचारात घेऊन आता बाजार समिती प्रशासनाने या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असली तरी देखील शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे शेतकऱ्यांना वेळेवर देणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे.
सोलापुरातील सिद्धेश्वर एपीएमसीमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कांद्याची विक्रमी आवक होत आहे. या एपीएमसीमध्ये वजन काटा झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लगेचच चेक स्वरूपात पैसे दिले जातात. या 9 व्यापाऱ्यांनी देखील कांदा खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केला होता.
शेतकऱ्यांनी धनादेश प्राप्त झाल्यानंतर बँकेचा दरवाजा गाठला आणि धनादेश बँकेत जमा केला असता धनादेश असलेल्या बँक खात्यात पैसे नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात तक्रार बाजार समिती प्रशासनात दाखल केली. त्याअन्वये आता संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासन कारवाई करणार आहे.
सिद्धेश्वर एपीएमसीमध्ये अनेक व्यापारी परवाने नसतानाही कांद्याची खरेदी करीत होते. आणि अशा विनापरवाना धारी व्यापाऱ्यांनीचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे? याला जबाबदार कोण असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. परवाने असलेल्या व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्यास बाजार समिती प्रशासनास हस्तक्षेप करता येतो.
यामुळे आता बाजार समिती प्रशासनाने मार्चअखेरपर्यंत सर्व व्यापाऱ्यांना परवाने नूतनीकरण करण्यास सांगितले आहे. शिवाय परवानाधारक व्यापाऱ्यांकडेच शेतमालाची विक्री करावी असे यावेळी बाजार समितीने आवाहन देखील केले आहे. एकंदरीत या घटनेवरून शेतकरी बांधवांनी धडा घेत परवाना असलेल्या व्यापाऱ्यांकडे शेतमालाची विक्री करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.
Published on: 23 March 2022, 10:36 IST