राज्यातील अनेक शेतकरी शेती क्षेत्रात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात, शेतकऱ्यांच्या या कौतुकास्पद प्रयोगामुळे असे शेतकरी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच नावीन्यपूर्ण प्रयोग करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे सफरचंद हे पूर्णतः थंड हवामानात येणारे फळपीक आहे. याची लागवड मुख्यतः भारतातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश यांसारख्या थंड प्रदेशात लक्षणीय नजरेस पडते. मात्र विदर्भातील एका अवलिया शेतकऱ्याने या थंड हवामानातील सफरचंद पिकाची लागवड केल्याचे वृत्त समोर आले आहे.
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील मौजे देऊळगाव येथील रहिवाशी शेतकरी संतोष नारायण वानखेडे या शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात एक नावीन्यपूर्ण प्रयोग प्रत्यक्षात आणून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. संतोष यांनी आपल्या शेतात चक्क सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. संतोष यांनी लागवड केलेल्या सफरचंदाला आता एक वर्षाचा काळ उलटून गेला आहे आणि आता सफरचंदाची झाडे चांगली जोमाने वाढत असल्याचे संतोष यांनी यावेळी कथन केले. संतोष यांनी सफरचंद लागवड पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करण्याचा निर्धार घेतला आहे त्या अनुषंगाने संतोषी यांनी पूर्ण सेंद्रिय खतांचा सफरचंद पिकासाठी वापर केला आहे. संतोष यांनी सफरचंदाची जवळपास 550 झाडे आपल्या 20 गुंठे क्षेत्रात लावली आहेत. संतोष यांच्या या प्रयोगाचे कौतुक होण्याचे कारण असे की, सफरचंद हे पूर्णतः हवामानाचे पीक आहे आणि अकोला हे उष्ण हवामानासाठी ओळखले जाते त्यामुळे संतोष यांचा प्रयोग हा खरंच खूप धाडसी आहे.
वानखेडे यांनी 120 रुपये प्रमाणे सफरचंदांच्या रोपांची खरेदी केली आहे, सफरचंद शेती पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करत असल्याने त्यांना रोपट्याशिवाय इतर बाबींवर खर्च करण्याची गरज भासत नाही. सफरचंद पिकासाठी आवश्यक कीटकनाशक जीवामृत टॉनिक सर्वकाही सेंद्रिय पद्धतीने वानखेडे स्वतः घरी तयार करतात. वानखेडे यांनी 2021 मध्ये जानेवारी महिन्यात सफरचंद रोपांची लागवड केली, त्यांनी एचआरएम 99, अण्णा, डोअरशेड गोल्डन या प्रजातींच्या सफरचंदाची लागवड केली, शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या तिन्ही जातींचे सफरचंद 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात देखील उत्तम रित्या वाढतात त्यामुळे वानखेडे यांनी या विशेष जातींची निवड केली आहे. वानखेडे यांनी सांगितले की, त्यांच्या सफरचंद त्यांना आता एक वर्ष पूर्ण झाला आहे आणि सफरचंदाची झाडे जवळपास आठ फूट उंचीपर्यंत चांगली वाढली आहेत.
गतवर्षी प्रचंड उन्हात त्यांनी सफरचंदाची लागवड केली मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सफरचंदाचे झाडे आता जोमाने वाढत असून येत्या तीन वर्षात या झाडांचा पहिला हंगाम येणार असल्याने त्यांनी आतापासूनच सफरचंदाच्या झाडाची छाटणी करण्यास प्रारंभ केला आहे. सफरचंदांच्या पिकात त्यांनी कांदा व हरभरा या पिकांचे आंतरपीक घेतले आहे, खरीप हंगामात त्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले तर आता रब्बी हंगामात त्यांनी हरभरा आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. विशेष म्हणजे आंतरपिके देखील पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने वानखेडे घेत आहेत. वानखेडे यांनी सांगितले की जेव्हा सफरचंदाची झाडे फलधारणा करण्यासाठी तयार होतील तेव्हा एका झाडापासून सुमारे 20 किलो पर्यंतचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.
Published on: 26 January 2022, 12:13 IST