शेतीपूरक व्यवसायात आता जिवंत शिंपल्यातून मोती बीजोत्पादनाचा एक पर्याय समोर येत असून ही नवी वाट शेकडो शेतकरी वापरत आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यातील शेतकरी मोतीची शेती करत आहेत. आता महाराष्ट्रातील शेतकरीही या शेतीकडे वळत आहेत. याचेच एक उदाहरण औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात सुमारे पाचशेच्या आसपास शेततळ्यातून मोती बीजोत्पादन घेतले जात आहे. नांदेड, बारामतीतील शेतकरीही या प्रयोगाकडे वळत आहेत.शहराजवळील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अरुण अंभोरे यांनी एका कंपनीच्या माध्यमातून शेततळ्यातून मोती बीजोत्पादनासाठी शेतक ऱ्यांची एक साखळीच तयार केली. काही शेतक ऱ्यांनी गट पद्धतीनेही ही नवी वाट धरली आहे. अंभोरे आणि त्यांचा चमू शेतक ऱ्यांना मोती बीजोत्पादनासाठी मार्गदर्शनही करतो. या उत्पादनात विमा कवच असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचा दावा अंभोरे यांनी केला.
औरंगाबादजवळील जयपूर येथील प्रभू साहेबराव मते हे शुक्रवारी मोती बीजोत्पादन घेण्याच्या उद्देशाने अंभोरे यांच्याकडे जिवंत शिंपले खरेदीसाठी आले होते. मते यांना त्यांचे शेंद्रा येथील एक नातेवाईक काकासाहेब पाटील कचकुरे यांच्याकडून मोती बीजोत्पादनाची माहिती मिळाली होती. त्यांच्या मागेच जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील बाकरवाडी येथील विक्रम तिडके हेही दाखल झाले होते.
मोती बीजोत्पादनाकडे वळण्याचे कारण सांगताना मते म्हणाले, ‘गेल्या वर्षी खूप पाऊस झाला, पण पिकांचे नुकसानही अतोनात झाले. दुष्काळ तर पाचवीलाच पुजलेला आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका पारंपरिक पिकांतून मिळणाऱ्या उत्पादनाला बसतो. परिणामी शेतकरी अधिकाधिक संकटात सापडतो. उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा कायम विचार असतो. त्यात आता मोती बीजोत्पादनाचा एक मार्ग सापडला आहे. इतर मार्गाप्रमाणे तोही चोखाळून पाहू म्हणून शेततळ्यातून मोती बीजोत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.’
अरुण अंभोरे यांनी भुवनेश्वरमधील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेश वॉटर अॅक्वाकल्चर – सिफॉ येथे मोती बीजोत्पादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. शेततळ्यात मत्स्यबीजोत्पादन घेण्याचे प्रयोग केले जात आहेत. त्यासोबतच मोती बीजोत्पादनही शेतक ऱ्यांना करता येऊ शकते, यासाठी जनजागृती करून ते एक नवी वाट समोर ठेवत आहेत. औरंगाबाद, नांदेड, बारामतीसह इतरही काही जिल्ह्य़ातील अनेक शेतकरी शेततळ्यातून मोती बीजोत्पादन घेण्याकडे वळत असल्याचे अंभोरे सांगतात.
साधारण ८१ रुपयात एका जिवंत शिंपल्यातून मोतीबीज शेतक ऱ्यांच्या शेततळ्यात नेऊन सोडले जाते. वर्षभरात जिवंत शिंपल्यातून प्रत्यक्ष मोत्याचे उत्पन्न हाती येते. त्यात काही शिंपले मृत होतात. त्याला विम्याचे कवच दिले जाते. त्यामुळे शेतक ऱ्यांना गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे मिळतात. शेतक ऱ्यांकडील एका जिवंत शिंपल्यातील मोत्यांची आम्ही ३६० रुपयाप्रमाणे खरेदी करतो. असल्याचे अंभोरे सांगतात.
गोल मोती निर्मितीची प्रक्रिया आणि जिवंत शिंपल्यातून मोती बीजोत्पादन करण्याची पद्धत यात फरक आहे. गोल मोती हा नैसर्गिक. मात्र, शिंपल्यातून शेततळ्यात होणारा मोती हा आर्टिफिशिअल आहे. दागिन्यांच्या निर्मितीत त्याला स्थान मिळते. शेतक ऱ्यांकडे तयार झालेला मोती आम्ही हैदराबाद, सुरत, मुंबईच्या बाजारपेठेत विक्री करतो, असे अरुण अंभोरे यांनी सांगितले.
अशा प्रकारे बनतात मोती
समुद्रातून जिवंत शिंपले आणले जातात. त्यांच्यामध्ये मृत शिंपल्याची भुकटी व रासायनिक पदार्थाच्या आधारे मोतीबीज तयार करून सोडले जातात.
त्यांना चार दिवस प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे सोडलेल्या पाण्यात टाकले जाते. यामध्ये शिंपल्याची जखम भरून आली की ते एका जाळीवर बांधले जातात.
या जाळ्या विशिष्ट पद्धतीने शेततळ्यात सोडल्या जातात. पाण्यातील नैसर्गिक शेवाळावर जिवंत शिंपले जगतात आणि त्यात वर्षभरात मोती तयार होतात.
Published on: 30 January 2021, 03:02 IST