आपण मोबाईलच्या वाढत्या संख्येचा असा वापर करायला शिकले पाहिजे. मोबाईल फोन बाळगणारे शेतकरी आप आपसामध्ये आणि अन्य लोकांमध्ये संपर्क साधत असतीलच. परंतु या संपर्काला व्यावसायिक रुप दिले की, आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्यांनी मोबाईलचा व्यावसायिक म्हणजे शेतीच्या तंत्रासाठी वापर व्हायला लागला की, त्याचा फायदा आपल्यालाही कसा घेता येईल याचा विचार करायला शिकले पाहिजे. तामिळनाडूमध्ये कोईमतूर येथे असलेल्या तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाने यादृष्टीने एक वेगळा उपक्रम योजिलेला आहे. या उपक्रमात शेतकर्यांना राज्यातल्या महत्वाच्या बाजारपेठातील महत्वाच्या कृषी मालाचे भाव दररोज कळविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी एक स्वतंत्र वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. तिचा पत्ता www.tnau.ac.in आणि www.agritech.tnau.ac.in असा असून email – info@tnau.ac.in असा आहे.
या विद्यापीठाने तामिळनाडूमधील १२ मोठ्या बाजारपेठांमध्ये आणि बंगलोरमध्ये आपले स्वतंत्र प्रतिनिधी नेमले आहेत. हे प्रतिनिधी दुपारी ११ वाजेपर्यंत त्या त्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव गोळा करतात आणि हे बाजारभाव विद्यापीठाच्या केंद्राकडे पाठवतात. विद्यापीठाच्या केंद्रात या बाजारभावांचे विश्लेषण करून ते सोप्या भाषेत शेतकर्यांना इंटरनेटवरुन पाठवले जातात. म्हणजे आज राज्याच्या कोणत्या बाजारपेठेत सिमला मिरची महाग होती आणि कोणत्या बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कोसळलेले होते हे राज्यभरातल्या शेतकर्यांना दुपारी १ वाजता सोप्या भाषेत कळते.
आपण शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. कारण केवळ शेतीच नाही तर जगातली सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारली आहेत. शिवाय झालेली प्रगती सतत होत रहावी यासाठी नव्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे सुरूच आहे. शेतकर्यांनी मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल पण या प्रश्नाचे उत्तर फारसे अवघड नाही. तसा विचार केला तर आज ग्रीन हाऊसचा वापर होत आहे हे तंत्रज्ञानच आहे. या ग्रीन हाऊसमध्ये हवामान नियंत्रित केलेले असते. त्यामुळे त्याच्या बाहेर वातावरण कितीही वाईट असले तरीही या ग्रीन हाऊसमध्ये कधी दुष्काळ पडत नाही. उघडयावर केलेल्या शेतीपेक्षा या ग्रीन हाऊसमध्ये आठपट उत्पन्न जास्त होते.
Published on: 16 September 2020, 01:12 IST