News

गेल्या काही दिवसांपूर्वीच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीठ झाली होती, यामध्ये मोठे नुकसान झाले होते. आता भारतीय हवामान विभागाने बुधवारी देशातील हवामानसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व-ईशान्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

Updated on 03 February, 2022 4:04 PM IST

गेल्या काही दिवसांपूर्वीच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीठ झाली होती, यामध्ये मोठे नुकसान झाले होते. आता भारतीय हवामान विभागाने बुधवारी देशातील हवामानसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व-ईशान्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारीपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका, मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ आणि ४ फेब्रुवारीला गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय ३ फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तराखंड राज्यातही ३ आणि ४ फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३ आणि ४ फेब्रुवारीला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी काहीशी कमी झालेली थंडी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

काश्मीरमधील तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान शून्याच्या खाली गेले आहे. पुढील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे अचानक हवामान बदलत आहे. श्रीनगरमध्ये मंगळवारी तापमान उणे १.८ अंश सेल्सिअस होते. पण बुधवारी किमान तापमानात घट होऊन उणे १.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांमधील बहुतांश भागात किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी आणि मुसळधार पावसाचे अस्मानी संकट देशावर कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तास महत्वाचे असणार आहेत. यानंतर पुढची परिस्थिती समोर येईल. मात्र या काळात शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

English Summary: Farmers in Crisis Again, Sky Crisis in the Next Three Days, Chance of Hail ..
Published on: 03 February 2022, 04:04 IST