1. बातम्या

सेंद्रिय बिजोत्पादनातुन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ

KJ Staff
KJ Staff


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असुन औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 1 मार्च रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय अेडीएम कंपनीचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री. प्रकाश शेनॉय, कृषी अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, कृषीविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना जेष्ठ पिक पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे म्‍हणाले की, आज हवामान बदल, शेतीतील वाढत असलेला उत्‍पादन खर्च, जमिनीचे खालावलेले आरोग्य आदी पार्श्‍वभूमीवर सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने बघत आहेत. सेंद्रिय शेती करतांना शेतकऱ्यांनी मुलभुत तत्वांचे पालन करावे तसेच सेंद्रिय पिकांमध्ये सरळ व सुधारीत वाणाचा वापर करावा. आज सेंद्रिय बियाण्यास मागणी वाढत असुन सेंद्रिय बिजोत्पादनातुन शेतकरी आर्थिक पाठबळ मिळु शकते. गटशेतीच्या माध्यमातुन सेंद्रिय बिजोत्पादन राबविल्यास खर्चास बचत होऊन गुणवत्तापुर्ण बियाणे उपलब्ध होण्यास मदत होईल, यासाठी तांत्रिक पाठबळ देण्यास विद्यापीठ सदैव तयार आहे. 

अेडीमचे शेतकरी संपर्क प्रमुख श्री. प्रकाश शेनॉय आपल्‍या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांचे सेंद्रिय उत्पादन खरेदी अेडीएम पुढाकार घेईल  सेंद्रिय प्रमाणीकरणाचा खर्च कंपनीतर्फे करण्यात येईल. शेतकऱ्यांना सेंद्रिय माल उत्पादन प्रक्रीयेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहून कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने भविष्यात विविध उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतील असे त्‍यांनी सांगितले. कृषी अभियंता डॉ. स्मिता सोळंकी म्‍हणाल्या की, सेंद्रीय शेतीत वापरण्यात येणाऱ्या विविध निविष्ठांसाठी कमी खर्चाची व उपयोगी अवजारांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल. योग्य अवजारांचा वापर केल्यास खर्चाची व वेळेची बचत करता येईल. प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रिय शेतीत पिक उत्पादन  सेंद्रिय प्रमाणीकरण या दोन्ही बाबींवर लक्ष देणे आवश्‍यक असुन याबाबत योग्य प्रशिक्षण घेतले तर अपेक्षित लाभ घेता येईल, असे सांगितले.

तांत्रिक सत्रात डॉ. ए. एस. कारले यांनी सेंद्रिय पिक लागवड तंत्रज्ञान, हर्षल जैन यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण, डॉ. एस. ए. जावळे यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन, डॉ. ए. के. गोरे यांनी सेंद्रिय पिक व्यवस्थापन, कृषी अभियंता डॉ. सौ. स्मिता सोलंकी यांनी पशुशक्तीचा सेंद्रिय शेतीत कार्यक्षम वापर याविषयावर मार्गदर्शन केले. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे संकल्‍पनेतुन व मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतिश कटारे यांनी केले तर आभार अभिजीत कदम यांनी मानले. प्रल्हाद गायकवाड, बालु दारभळे, डॉ. सुनिल जावळे, सचिन रनेर, नागरेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणास औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters