शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटे संपायचे नाव घेत नाहीत. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतमाल पडून राहिला आहे. राज्यातील काही बाजार समित्या बंद असल्याने आणि कालच्या धुलीवंदन सणामुळे मार्केट बंदचा परिणाम भाजीपाला बाजारात पहायला मिळाला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये एकूण ६२५ गाड्यांची आवक झाली. मात्र ग्राहकांअभावी जवळपास ८० टक्के शेतमाल मार्केटमध्ये पडून राहिल्याचे व्यापारी सांगत आहेत.
त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त झाले असून पडून राहिलेल्या शेतमालाचे काय? असा प्रश्न त्यांचा समोर उभा राहिला आहे. तर या परिस्थितीमुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली. काही भाज्यांच्या दरात थेट प्रतिकिलो ८ ते १० रुपये घसरण झाल्याचा शेतकऱ्याला देखील मोठा फटका बसणार आहे. काही भाज्या वगळता सर्वच भाज्या १० ते १२ रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने ग्राहकांना भाजीपाला महाग विकत घ्यावा लागतो. मात्र अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातील भाजीपाला किरकोळ व्यापारी आहेत. उत्तर भारतात धूलिवंदन अर्थातच होळी सण रंग खेळून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे हे व्यापारी कालच्या सणांमुळे आज बाजारात भाजीपाला खरेदीसाठी फिरकलेच नाही. परिणामी मुंबई APMC भाजीपाला बाजारात माल पडून दर घसरल्याचे चित्र दिसून आले. तोडणीसाठी आलेला शेतमाल अधिक दिवस ठेवल्यास तो खराब होऊन शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागते.
गृहमंत्र्यांसोबत बैठक होऊन सुद्धा शेतमाल बाजार समिती बाहेर जात आहे. याबाबत बाजार समिती कोणतेही ठोस पाऊले उचलत नसून याकडे दुर्लक्ष करत आहे. तिकडे शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही अशा परिस्थिती शेतकरी असताना शेतमालाला बाजारभाव न मिळणे हे चांगले नाही. शिवाय बाजार समिती बाहेर जाणाऱ्याला मालावर नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे मत मुंबई घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे यांनी 'कृषी जागरण' कडे व्यक्त केले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला बाजारातील दर (प्रतिकिलो) काकडी १० ते १२ रुपये, भेंडी १० ते १६ रुपये, वांगी ८ ते १० रुपये, वाटाणा(रतलम) १६ ते १८ रुपये, फ्लॉवर ३ ते ५ रुपये, गाजर १२ ते १५ रुपये, वालवड ३६ ते ४० रुपये, घेवडा ४० रुपये, शिमला ४० ते ५२ रुपये, दूधी १० ते १२ रुपये, दोडका १६ ते २० रुपये, वांगी १२ ते १५ रुपये, गावठी वांगी १४ ते २० रुपये, शेवगा ४५ ते ४८ रुपये, कोथिंबीर १२ ते १५ रुपये, मेथी १० ते १२ रुपये, पालक ७ ते १० रुपये, शेपू ७ ते १० रुपये, टोमॅटो १६ ते १८ रुपये असा दर आहे.
महत्वाच्या बातम्या;
बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक.
बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेत घुसले आणि..
'असानी' चक्रीवाद वाढवणार शेतकऱ्याचे टेन्शन, राज्यात चक्रीवादळामुळे गारपीट आणि पावसाची शक्यता
Published on: 20 March 2022, 10:15 IST