Nashik News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा ताफा कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच या शेतकऱ्यांनी टोमॅटो आणि कांदे रस्त्यावर फेकून देऊन त्यांचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी अजित पवार यांना काळे झेंडे देखील दाखवले आहेत.
नाशिक जिल्ह्यात तेरा दिवस बाजार समित्या बंद होत्या. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाले. त्यावर देखील सरकारने कोणताही तोडगा काढला नाही. तसंच टोमॅटोचे दर देखील मागील काही दिवसांपासून गडगडले आहेत. जेव्हा दर वाढतात तेव्हा सरकार टोमॅटो आयात करते. दर कमी झाल्यावर त्यावर का तोडगा काढत नाही? असा संतप्त सवाल देखील यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवारांचा ताफा अडवत शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. तसंच टोमॅटोला कमी दर मिळत आहे तरी सरकार यावर काही उपाययोजना राबवत नसल्याने शेतकऱ्यांनी आज संताप्त व्यक्त केला आहे.
अजित पवार आज दिंडोरी, कळवण, नाशिक भागाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनात सायंकाळी सहाला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ असणार आहेत.
कळवण येथील साई लॉन्स येथे पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी व कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. तसंच नाशिकमधील प्रसिद्ध सह्याद्री फार्मला देखील अजित पवार भेट देणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
Published on: 07 October 2023, 11:15 IST