राज्यात कांदा या नगदी पिकाची तिन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्याच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी सर्वात जास्त उत्पादन हे पश्चिम भागातच घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकरी हे सर्वस्वी कांदा पिकावर अवलंबून असतात. कांदा जरी नगदी पीक म्हणून ओळखले जात असले तरीसुद्धा शेतकरी बांधव याला नेहमीच बेभरवशाचे पीक म्हणून संबोधत असतात, मात्र असे असले तरी यावर्षी या बेभरवशाच्या पिकाने शेतकऱ्यांच्या गालावर स्मित हास्य खुलवले आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी सुरू आहे तसेच, कांदा उत्पादक शेतकरी लाल कांदा विक्रीसाठी लगबग करताना नजरेस पडत आहेत. खरीप हंगामात जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला होता त्यामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे विशेषतः कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आणि परिणामी कांद्याच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. महाराष्ट्राप्रमाणेच इतरही प्रमुख कांदा उत्पादक राज्यात अशीच परिस्थिती नजरेस आली परिणामी देशांतर्गत जवळपास सर्वच बाजारपेठेत कांद्याला अद्यापपर्यंत समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड व येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते, या हंगामात देखील या दोन्ही तालुक्यात कांदा लावला गेला होता. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ एकाच आठवड्यात 25 कोटीहून अधिक रुपयाचा कांदा विक्री झाला.
येवला तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामातील रांगडा कांदाच लावला जातो, येवला तालुक्यात नेहमी दुष्काळसदृश्य परिस्थिती कायम असते म्हणून येथील शेतकरी उन्हाळी कांदा लागवड करीत नाहीत. मागील दोन-तीन वर्षापासून कांद्याला समाधानकारक बाजार भाव प्राप्त होत असल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली होती आणि आता रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तालुक्यात नजरेस पडत आहे. खरीप हंगामात लाल कांद्याच्या उत्पादनात घट झाली असल्याने बाजारपेठेत मागणी नुसार कांद्याचा पुरवठा नजरेस पडत नाही त्यामुळे कांद्याचे बाजारभाव गेल्या अनेक दिवसापासून कमालीचे स्थिर बनलेले आहेत. कांद्याला सध्या दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर प्राप्त होत आहे.
कांदा उत्पादक शेतकरी, सध्या कांद्याला मिळत असलेल्या बाजार भावामुळे समाधान तर व्यक्त करत आहेत मात्र त्यांना या बाजार भाव आतून विशेष असा फायदा मिळालेला दिसत नाही. खरीप हंगामात लाल कांदा लागवडीच्यावेळी जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता परिणामी लाल कांदा लागवडीसाठी तयार झालेली रोपे वाक्यातच सडली होती. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दराने कांद्याच्या रोपांची खरेदी केली आणि मजुरांना अधिकची मजुरी देऊन खरीप हंगामातील लाल कांदा लागवड केला. कांदा लागवडीनंतर देखील अवकाळीचे सावट जिल्ह्यात कायम होते या अवकाळी मुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पिकावर मोठा विपरीत परिणाम झाला आणि अनेक रोगांचा प्रादुर्भाव कांदा पिकावर झाला त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करावी लागली. एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी कांदा लागवडीसाठी अधिकच पैसा खर्च करावा लागला आहे. कांद्याचा उत्पादन खर्चात दुपटीने वाढ झाली मात्र कांद्याचे बाजार भाव हे फक्त समाधानकारक आहेत बाजार भावात दुपटीने वाढ अद्यापही बघायला मिळालेली नाही. म्हणून कांद्याला समाधानकारक बाजारभाव जरी मिळत असले तरी शेतकरी राजांना यातून फक्त उत्पादन खर्च काढता येऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा उचित मोबदला मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर नजरेस पडत आहे.
Published on: 25 January 2022, 02:36 IST