राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्व शेतकरी ‘ऑल इंडिया शेतकरी सभे’च्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत. सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ४ हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. नाशिक ते दिल्ली असा हा दुचाकी मोर्चा असणार आहे.यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या या बाईक रॅलीमध्ये २५० दुचाक्यांचा समावेश असून १,२६६ किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना चार दिवस लागणार आहेत. यासाठी त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये ओलांडावी लागणार आहेत.‘ऑल इंडिया शेतकरी सभे’चे सरचिटणीस अजित नवले यांनी या बाईक रॅलीची घोषणा केली होती. ते म्हणाले, “याद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कृषी विधेयकांना विरोध असल्याचे दाखवण्यात येणार आहे.
तसेच जोपर्यंत आम्ही आमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत परत राज्यात परतणार नाही.” दरम्यान, बाईक रॅलीवेळी आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्ही कोविड-१९च्या नियमांचे पालन करु आणि पूर्ण काळजी घेऊ असेही नवले यांनी म्हटले.
Published on: 21 December 2020, 01:54 IST