शेतकऱ्याच्या धाडसामुळे आणि प्रसंगावधान राखल्यामुळे पाच जणींचे प्राण वाचले
१. गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना वाचवण्यात यश आलं आहे. एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या मुलींना जीवदान मिळाले आहे. संजय सिताराम माताळे असे या देवदूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मुलींचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकताच शेतकरी संजय यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली.
बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करुन पाण्याच्या कडेला आणले.दुर्देवाने प्रयत्न करुनही दोन मुली संजय यांच्या हाताला न लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र या धाडसी कामगिरीमुळे अनेकांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केलं आहे. शिवाय अनेक नेतेमंडळींनी गावात जाऊन त्यांचा सन्मान केला.
हळदीची विक्रमी आवक, शेतकऱ्यांना विक्रीसाठी तीन दिवस मुक्काम करावा लागणार
२. आता बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातून
हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणामध्ये हळद आवक झाली आहे. यावर्षी हळदीला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने सर्वाधिक हळद ही हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाली.
त्यामुळे बाजार समितीच्या आवारात आणि त्याचबरोबर बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अक्षरशः हळद विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना तीन ते चार दिवस मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे वाहनांचे अतिरिक्त भाडे त्याचबरोबर जेवण असा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. बाजार समिती प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
'शेतकऱ्यांसाठी राजकारणात येत असाल तरच राजकरणात या' किसानपुत्र श्रीकांत गदळे यांचा अभिनेत्री कंगना राणावत यांना मोलाचा सल्ला
३. मध्यंतरी अभिनेत्री कंगना रनौत यांनी देशाला माझी गरज असेल तर राजकारणात यायला आवडेल अशी भूमिका मांडली होती. यावर आता किसानपुत्र श्रीकांत गदळे यांनी पत्राद्वारे तुम्ही शेतकऱ्यांसाठी राजकारणात येत असाल तरच राजकरणात या असा सल्ला दिला आहे.
शेतक-याचे कित्तेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत कोणीच ते सोडवू शकले नाही. तुमची कला पडदयावर दाखवली आता राजकारणात दाखवा. असंही त्यांनी म्हटलं आहे. चित्रपटासारख शेतक-याच अयुष्य झालं आहे हिरो एक तर व्हिलन ढिगभर आहेत. चित्रपटा सारखं शेतक-याच आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राजकारणात येणार असाल तरच या असा सल्ला त्यांनी दिला आहे.
'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा कोकण विभागालाही फायदा,ठाणे माहिती कार्यालयानं दिली माहिती
४. राज्य सरकारने सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचा कोकण विभागालाही फायदा होणार आहे. कोकणात शेतीक्षेत्राला विशेष महत्त्व आहे. त्यात भात हे कोकणाचे मुख्य पीक आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत येथील शेतकऱ्यांना शेती विषयक सर्व योजनांची माहिती त्यांच्या दारातच उपलब्ध होणार असल्याचं ठाणे माहिती कार्यालयानं म्हटलं आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. भात पीकासारख्या प्रमुख पीकाच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणी दूर होऊन उत्पादनात वाढ होईल. असंही माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच भात पीकासोबतच नाचणी, इतर तृणधान्य, हरभरा, वाल, चवळी, मुग, उडीद ही कडधान्य, गळीत धान्यही पीकवले जाते. या पीकांच्या उत्पादनात वाढ होण्यासही मदत होईल. त्यामुळे “शासन आपल्या दारी” या योजनेत सहभागी होवू या. असं आवाहन करण्यात आलं आहे.
लिव्हिंग ग्रीन्स आणि कृषी जागरण संस्थेमध्ये सामंजस्य करार
५. कृषी जागरण संस्थेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज लिव्हिंग ग्रीन्स सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून ती या संस्थेशी जोडली गेली आहे. या सामंजस्य करार कार्यक्रमात लिव्हिंग ग्रीन्स कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीची कार्यशैली समजावून सांगितली.
यांनतर कृषी जागरण संस्थेचे मुख्य संस्थापक आणि संपादक एम सी डॉमिनिक यांच्यासह लिव्हिंग ग्रीन्सचे कंपनी सीईओ प्रतिक तिवारी आणि कंपनीचे सीओओ विशाल सिंह उपस्थित होते.लिव्हिंग ग्रीन्स ही भारतातील पहिली आणि सर्वात मोठी शहरी सेंद्रिय शेती कंपनी आहे.
राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली जिल्हा बंदीची नोटीस मागे
६. बारसू प्रकरणाबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. आणि याचं समर्थन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीदेखील केलं होत. यांनतर मात्र राजू शेट्टींना जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली. जिल्हा बंदीची नोटीस मागे न घेतल्यास न्यायालयात धाव घेणार असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं होत. आता राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली जिल्हा बंदीची नोटीस मागे घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून त्यांना ३१ मे अखेर पर्यंत जिल्हा बंदीची नोटीस लावण्यात आली होती.
अधिक बातम्या:
काळा पेरू ठरतोय फायदेशीर, औषधी असल्याने मागणीही जास्त...
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार
कृषी जागरण आणि लिव्हिंग ग्रीन्स ऑरगॅनिक्स यांच्यात सामंजस्य करार, शहरी सेंद्रिय शेतीला चालना मिळणार
Published on: 16 May 2023, 02:06 IST