Farmer Protest Update : देशातील शेतकरी पुन्हा 'किसान आंदोलन २.०' साठी सज्ज झालेत. पंजाबमधून शेतकऱ्यांचा लॉग मार्च दिल्ली काबीज करण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनाला 'चलो दिल्ली मार्च' नाव देण्यात आलं असून यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार आहेत. यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या सीमांवर पोलीस प्रशासनाकडून सिंमेट बॅरिकेट आणि खिळे ठोकण्यात आले आहेत. आंदोलक शेतकरी अमृतसर दिल्ली-राष्ट्रीय महामार्गावरून हरियाणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अंबाला येथील शभूम सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीमा पूर्णपणे सील करण्यात आली आहे.
आंदोलक शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी सरकारकडे किमान आधारभूत किंमतीची आहे. या मागण्यांबाबत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि शेतकरी नेत्यांसोबत आज (दि.१२) रोजी सेक्टर २६ चंदीगड येथे बैठक होणार आहे. तसंच १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) सरकारने सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा करावा.
२) शेतकरी व शेतमजुरांसाठी संपूर्ण कर्जमाफी योजना लागू करावी.
३) देशभरात भूसंपादन कायदा २०१३ पुन्हा लागू करा.
४) लखीमपूर खेरी हत्याकांडातील दोषींना शिक्षा आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय.
५) जागतिक व्यापार संघटनेतून माघार घ्या आणि सर्व मुक्त व्यापार करारांवर बंदी घाला.
६) शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन देणे.
७) दिल्ली आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी.
८) सरकारने वीज दुरुस्ती विधेयक २०२० रद्द करावे.
९) शेतीशी जोडून, मनरेगा अंतर्गत वर्षाला २०० दिवसांचा रोजगार आणि ७०० रुपये रोजंदारी.
१०) बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खते बनवणाऱ्या कंपन्यांवर कडक दंड आणि बियाण्याच्या दर्जात सुधारणा.
११) मिरची, हळद आणि इतर मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना.
१२) आदिवासींच्या जमिनीची लूट करणाऱ्या कंपन्यांना रोखून जल, जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा हक्क सुनिश्चित करणे.
सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शेतकरी संघटनांच्या दिल्ली मार्च आंदोलनासंदर्भात हरियाणा पोलिसांनी अभेद्य सुरक्षा व्यवस्था केली आहे. पंजाब सीमेवर त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वप्रथम बीएसएफचे जवान असतील आणि त्यांच्या मागे आरएएफ आणि तिसऱ्या थरात हरियाणा पोलिसांचे सशस्त्र सैनिक तैनात असणार आहेत. पंजाबची सीमा सील करण्याबरोबरच लिंक रोडवर पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले असून १३ फेब्रुवारीला तपासणी आणि परवानगी मिळाल्यानंतरच वाहनांना हरियाणात प्रवेश दिला जाणार आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याअंतर्गत ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा मोर्चा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच राज्यभरातील गुप्तचर विभागाचे कर्मचारी क्षणोक्षणी माहिती गोळा करून मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवत आहेत. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविणाऱ्या भ्रामक घटकांवर लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा हरियाणा पोलिसांनी दिला आहे.
Published on: 12 February 2024, 12:55 IST