News

मुंबई: पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ‘ब्लड ऑन कॉल’ ही योजना विशेष बाब म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या योजनेचा आदिवासी भागात मोठा लाभ होणार आहे.

Updated on 18 December, 2018 8:15 AM IST


मुंबई:
पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ‘ब्लड ऑन कॉल’ ही योजना विशेष बाब म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या योजनेचा आदिवासी भागात मोठा लाभ होणार आहे.

गर्भवती माता तसेच प्रसुतिदरम्यान रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील बांधवांना रक्त पिशवी आणण्याकरिता नाशिक, ठाणे, पालघर येथे जायला लागायचे. मात्र आता जव्हार कुटीर रुग्णालयात शासकीय रक्तपेढी सुरु झाल्याने आदिवासी भागातील रुग्णांना रक्तासाठी वणवण फिरण्याची गरज भासणार नाही. ही रक्तपेढी या भागातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात जीवन अमृत सेवा’ (ब्लड ऑन कॉल) ही योजना जिल्हास्तरावरच सुरु करण्यात आलेली आहे. मात्र आदिवासी आणि दुर्गम भागातील गरज लक्षात घेता विशेष बाब म्हणून अमरावती, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यातील अनुक्रमे धारणीचुर्णी, डहाणू, जव्हार, धडगाव, अक्कलकुवा येथे ही योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या रक्त साठवणूक केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार रक्त पुरवठा केला जाईल.

आदिवासी आणि दुर्गम भागात प्रसुतिदरम्यान मातामृत्यूचे प्रमाण लक्षात घेता या योजनेंतर्गत रुग्णाला वेळेत रक्तपुरवठा झाल्यास प्रसुतिदरम्यान होणारे मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 16 लाख 2 हजार 690 रक्त पिशव्यांचे संकलन करून महाराष्ट्र रक्त संकलनात देशात अग्रेसर असल्याचे सांगतानाच एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात एक टक्का रक्त उपलब्ध असणे आवश्यक असून महाराष्ट्राचे रक्तसंकलन हे लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

English Summary: Extremely Inaccessible Talukas Start Blood on Call for Blood
Published on: 18 December 2018, 08:13 IST