मुंबई: खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै अशी होती. ही मुदत वाढवून दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती. तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज पुन्हा दोन दिवसांसाठी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व 'आपले सरकार सेवा केंद्र' (डिजिटल सेवा केंद्र) यांच्यामार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.
Published on: 30 July 2019, 08:50 IST