छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती पोहोचली पाहिजे. त्यासाठी ग्रामसभांपर्यंत, ग्राम पातळीवर योजनांची माहिती पोहोचवा. प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत उपाययोजना राबवा. खरीप हंगामात कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही याचे नियोजन करा,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.
खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, खा.संदिपान भुमरे, खा.डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. राजेश राठोड, आ. संजय केणेकर, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पहेलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना तसेच युद्धा शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सादर केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी मुद्दे मांडले.
आ. प्रशांत बंब यांनी सुचना केली की, बोगस बियाणे वा खते किटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते मात्र त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अदा करण्याची कारवाई करण्यात यावी.
आ. रमेश बोरनारे यांनी, खतांचे लिंकिंग होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेत समाविष्ट गावांमध्ये समित्या तयार करुन त्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. कुसूम योजनेत तसेच मागेल त्याला सोलर या योजनेत चांगल्या व दर्जेदार सेवा देणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सुचना केली.
आ. विलास भुमरे यांनी आवंटनानुसार प्राप्त होणाऱ्या खतांचे रेकिंग स्विकारण्यासाठी त्या त्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांना आवंटन तपासण्यास उपस्थित ठेवावे,अशी सुचना केली.
आ. संजना जाधव यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबास लाभ मिळावा यासाठी अटी शिथिल कराव्या.
आ. संजय केणेकर यांनीही, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या मंजूर नामंजूर प्रकरणांची माहिती देण्यात यावी अशी सुचना केली.
आ. अनुराधा चव्हाण यांनी, ॲग्रीस्टॅक कार्डासाठी गावपातळीवर माहिती पोहोचवावी. त्यासाठी शेतकऱ्यांना भविष्यात योजनांचा लाभ मिळण्यासाठी हे कार्ड असणे अनिवार्य असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी यासाठी मोहीम राबवावी,अशी सुचना केली.
आ. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची नुकसान भरपाई देण्याबाबत उपाययोजना राबवावी. नांदुर मध्यमेश्वर सह अन्य प्रकल्पातून सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाच्या वेळा पाळल्या जाव्या. खताचे लिंकींग बाबत कारवाई करतांना ती खत कंपन्यांवरही करावी. ॲग्रीस्टॅक नोंदणी करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्या, अशा सुचना केल्या.
खा.डॉ. कराड यांनी खतांचे आवंटन व त्यासाठी खतांचा पुरवठा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्नांबाबत सांगितले. खा. डॉ. काळे यांनी खतांचे लिंकींग करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. खतांचे नियोजन करतांना व जिल्ह्याचे नियोजन करतांना बदलत असलेल्या पीक पद्धतीचा विचार व्हावा. खतांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन सुचना द्याव्या व पीक कर्ज हे ३० जून पर्यंत वाटप करावे. तसेच सोलर पंपासाठी शेतकऱ्यांची किमान क्षेत्राची अट शिथिल करावी, अशा सुचना केल्या.
मंत्री श्री. अतुल सावे यांनी निर्देश दिले की, मान्सून पूर्व रोहित्रे व अन्य प्रकारच्या देखभालीचे काम उर्जा विभागाने पूर्ण करावे. अवकाळी पावसामुळे पिकांसोबतच जनावरांचेही नुकसान झाले आहे त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे. नुकसान भरपाईपोटी मिळणारी रक्कम कर्ज खात्यात वळती करु नये.
खा. संदिपान भुमरे यांनी सुचना केली की, धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकऱ्यांकडे अल्प क्षेत्र शिल्लक राहिले आहे. मागेल त्याला सोलार या योजनेसाठी असे शेतकरी पात्र ठरत नाही. त्यासाठी हे निकष बदलावे.
Published on: 13 May 2025, 01:24 IST