राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. यासह राज्यातल पूर्वमोसमी पावासा पोषक हवामान असल्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान उन्हाचा वाढलेला चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र अंतर्गत कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण अंदमान समुद्र किनारपट्टी परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. अनेक राज्यांमध्ये पुर्वमोसमी पावासाने दमदार हजेरी लावली आहे.
रविवारी दिल्ली –एनसीआरसह देशातील इतर राज्यात वादळासह पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी विज पडल्याची घटनाही घडली. मराठवाड्याला पावसाने दणका दिला. काही ठिकाणी ठिकाणी गारा पडल्या. उस्मानाबादमध्येही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरातील खडकी येथे झाडावर वीज पडल्याने हार्ट फेल होऊन ३२ वर्षीय नितीन काकासाहेब मैद या मेंढपाळाचा मृत्यू झाला. नांदेड, परभणी, हिंगोली. औरंगाबादमध्ये शनिवारी रात्री उशिरा पाऊस पडला. रविवारी दुपारनंतरही मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्यात पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे , फळपिके, भाजीपाला, चार, हळद या पिकांना तडाखा बसला आहे.
हवामान विभागाच्या मते पुढील २४ तासात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर – पश्चिमी उत्तर प्रदेशात हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर पूर्वी उत्तर प्रदेश, दक्षिण-पूर्वी मध्य प्रदेश, दक्षिणी छत्तीसगढ़, तेलंगाना, आंध्र प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.३ अं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी पर्यंतचे राज्यातील तापमान पुणे- ४०.६, जळगाव ४३.५, धुळे-४२.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.१, निफाड ४०.१, सांगली-३९.८, सोलापूर ४१.७, डहाणू ३४.३, सांताक्रुझ ३४.०, रत्नागिरी ३४.३, औरंगाबाद ४१.७, परभणी ४३.०, नांदेड ४२.०, अकोला-४४.३, अमरावती ४३.२, बुलडाणा ४१.६, बह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४३.५, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.९, वर्धा, ४२.८ यवतमाळ ४३.५.
Published on: 11 May 2020, 01:07 IST