परभणी, सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना संपत असताना आता शेतकऱ्याची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असे असताना आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना उर्वरित २५ टक्केनुसार अनुदान देण्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी ६७ कोटी ८१ लाख ५ हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यासाठी ५६ कोटी १७ लाख ९२ हजार रुपये निधी मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी या मदतीची मागणी करत होते. अखेर हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत. याबाबत माहिती महसूल विभागातर्फे देण्यात आली आहे.
यामध्ये हिंगोली जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ३१ हजार ५७३ आणि बाधित क्षेत्र २ लाख ९५ हजार ९४७ हेक्टर आहे. ७५ टक्के नुसार २२२ कोटी ९४ लाख ४० हजार रुपये प्राप्त झाला होता. २५ टक्क्यांनुसार प्राप्त ५६ कोटी १७ लाख ९२ हजार रुपये निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले होते. त्या त्या ठिकाणी सरकारकडून मदत देण्याचा प्रयत्न केला जाते आहे. उस्मानाबादमध्ये देखील मदतीची उर्वरित रक्कम काही दिवसांपूर्वीच जमा केली आहे.
तसेच यामध्ये परभणी जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर कालावधीतील अतिवृष्टी, पूरपरिस्थितामुळे बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या ४ लाख ४४ हजार ७५१ आणि बाधित क्षेत्र ३ लाख ३९ हजार हेक्टरवर आहे. पहिल्या टप्प्यात ७५ टक्के नुसार एकूण २५५ कोटी १९ लाख १ हजार रुपये निधी मिळाला आहे. यामुळे राहिलेल्या रकमेसाठी पाठपुरावा सुरुच होता. यामुळे दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २५ टक्के प्रमाणे ६७ कोटी ८१ लाख ५ हजार रुपये प्राप्त निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला.
दरम्यान, राज्यात सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच दिवस वीज मिळावी यासाठी माजी खासदार राजू शेट्टी गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमध्ये आंदोलन करत आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. आता यावर काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: 25 February 2022, 04:56 IST