गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करत आहेत. राज्यातील अनेक शेतकरी कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे पुरता भरडला जात आहे. मराठवाड्यात अलीकडचे दोन-तीन वर्षे सोडता नेहमीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती बनलेली असते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एका अवलिया शेतकऱ्याने एक नावीन्यपूर्ण कार्य करून दाखवले आहे.
सततच्या दुष्काळामुळे होत असलेल्या नुकसानिवर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका प्रगत शेतकऱ्याने अजिबो गरिब विहीर बांधणी केली आहे. या अवलिया शेतकऱ्याने तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून जवळपास दीड एकर क्षेत्रात विहीर बांधली आहे. या शेतकऱ्याच्या मते, सलग चार वर्षे जरी पावसाचे आगमन झाले नाही तरीदेखील या विहिरीतील पाणी चार वर्ष पन्नास एकरावरील बागायत क्षेत्राला पुरू शकते. ही विहीर दुष्काळी भागातील सर्वात मोठी विहीर म्हणून नोंदवली जाईल का याबाबत मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. बीड जिल्ह्यातील या अवलिया शेतकऱ्याचे हे विशेष आणि अजिबो गरिब कार्य सध्या पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय आहे.
का बांधली एवढी मोठी विहीर
जिल्ह्यातील गेवराई तालुक्या मधील पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे या प्रगत शेतकऱ्याने हा अजिबो गरिब कारनामा करून दाखविला आहे. या अवलियाने आपल्या दीड एकर क्षेत्रावर दोन कोटी रुपये खर्च करून विहीर बांधणी केली आहे. बजगुडे यांच्याजवळ बारा एकर बागायती क्षेत्र आहे मात्र सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थिती मुळे एवढे मोठे बागायती व भारी जमिनीचे क्षेत्र असून देखील त्यांना पाण्याअभावी कवडीमोल उत्पन्न प्राप्त होते.
या परिस्थितीमुळे या शेतकऱ्याला नानाविध अडचणींना सामोरे जावे लागते. बारा एकर क्षेत्र असतानादेखील पाण्याअभावी कायमच उत्पादनात घट होत होती या परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी एक ठोस उपाययोजना करण्याची गरज बजगुडे यांना भासू लागली. बजगुडे यांना पाण्याची सर्वात मोठी अडचण निर्माण झाली होती त्या अनुषंगाने त्यांना पाण्याचा साठा करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून दीड एकर क्षेत्रात विहीर बांधणी केली. विहीर बांधण्यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली विहीर बांधताना देखील बजगुडे यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. विहीर खोदताना निघालेला मुरूम त्यांनी महामार्गाच्या कामात दिला असून त्यांना त्या बदल्यात वीस लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विहीर बांधण्याचे नियोजन केले त्या अनुषंगाने त्यांनी साडे पाच परस खोलवरून सिमेंटचे कडे बांधले.
बजगुडे यांच्या मते, मागील सहा महिन्यापासून विहीर खोदण्यासाठी व बांधण्यासाठी सुमारे ऐंशी मजूर दररोज नित्यनियमाने कार्य करत होते. बजगुडे यांनी विहीर बांधण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला मात्र सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मोठ्या जिद्दीने त्यांनी या विहिरीचे कार्य पूर्णत्वास नेले. बजगुडे यांच्या विहिरीत सुमारे 10 कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. असे सांगितले जात आहे की ही विहीर महाराष्ट्रातील सर्वात मोठी विहीर म्हणून नोंदवली जाऊ शकते. यामुळे मारुती यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. पंचक्रोशीत या दोन कोटी रुपये किमतीच्या विहीर बांधणीची चर्चा रंगताच अनेक नागरिकांनी विहीर बघण्यासाठी बजगुडे यांच्या शेतात धाव घेतली.
Published on: 09 February 2022, 01:52 IST