काही दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनातील मागण्यांकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात उद्या शनिवारी एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हे प्रचंड अशा प्रमाणात संकटात सापडले आहेत. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाले आहेत. पण या सगळ्या गोष्टींच्या संवेदना या सरकारला राहिलेल्या नाहीत. दुधाला २५ रुपये हमीभाव देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. परंतु ते या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नाही. अशा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.
भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांचे आंदोलन झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु मंत्रिमंडळाच्या दोन बैठका होऊनही उत्पादकांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कोणताही ठोस निर्णय घेऊ शकले नाही. सरकारमधील मंत्र्यांच्या दूध संघांनी उत्पादकांना कमी दराने दूध खरेदी करण्याची भूमिका घेऊन एक प्रकारे उत्पादकांवर अन्याय केल्याचेही ते म्हणाले.
शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राहता येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे एक दुधाला मिळणारा कमी दरामुळे ग्रामीण भागातील हा शाश्वत व्यवसायही मोडकळीस आणण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने २० जुलै रोजी राज्यभर आंदोलन करून दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन दिले होते. या मागण्यांबाबत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही.
Published on: 31 July 2020, 03:54 IST