Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर जळगावमध्ये उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. पण पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईत हलवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्या उपचारांसाठी एअर अॅम्बुलन्सची सुविधा करुन दिली आहे. खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
रोहिणी खडसे यांनी एअर अॅम्बुलन्ससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेत.
एकनाथ खडसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखत आहे. आज त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. आता मात्र खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या छातीत बर्निंग सेंच्युरीनचा त्रास होता. ते रुटीन चेकअपसाठी आले. तेव्हा त्यांचा रक्तदाब स्थिर होता. छातीत थोडं कंजेशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करण्याची गरज आहे. यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. विवेक चौधरी यांनी दिली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे खडसे समर्थकांची हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी झाली. खडसे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी हे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमले आहेत.
Published on: 05 November 2023, 05:22 IST