मुंबई: राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्याकरिता आता उर्वरित १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.
श्री. भुसे म्हणाले, यापूर्वी दि. ०९ जुलै, २०१९ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यांमधील सर्व तालुके तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा राज्यातील एकूण २४४ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वा तुषार सिंचन संच बसविण्याकरिता प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना देय असलेल्या ५५ टक्के अनुदानास २५ टक्के पूरक अनुदान देऊन एकूण ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
हेही वाचा :राज्यात चिंचेचा दर गगनाला ! बाजारात सरसरी दर ६ हजाराच्या पुढे
तसेच इतर शेतकऱ्यांना कमाल ५ हेक्टर क्षेत्रासाठी देय ४५ टक्के अनुदानास ३० टक्के पूरक अनुदान देऊन ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे. आता या योजनेंतर्गत राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनादेखील ८० टक्के अनुदान देण्याचा तसेच इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
तसेच १०७ तालुक्यांमध्ये शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा रु. ७५ हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने केला आहे, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी निवेदनात सांगितले.
Published on: 06 March 2020, 12:44 IST