सध्या देशात सर्वत्र तेलाच्या दरात विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकतेच खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली असताना देखील खाद्य तेलाच्या दरात होणारी वाढ एक चिंतेचा विषय बनली आहे. खाद्यतेलाच्या दरात अवाजवी वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
तेलाच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे. सोयाबीनचे दर अजूनही स्थिर आहेत. सोयाबीन हंगामाच्या प्रारंभी सोयाबीनचे दर गगन भरारी घेत होते. प्रारंभी सोयाबीनचे दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मात्र मध्यंतरी केंद्र सरकारच्या सोयाबीन आयातीच्या मंजुरीमुळे व वाढत्या आवकेमुळे सोयाबीनचे दर कमालीचे घसरले. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर विक्री होणार्या सोयाबीन पाच हजार रुपये प्रतिक्विंटल च्या घरात पोहोचला. मात्र तदनंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील गणित समजून घेतले आणि सोयाबीनचे भाव कमी असताना सोयाबीनची विक्री केली नाही.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजारपेठेत सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आणि पुन्हा एकदा सोयाबीनचे बाजार भाव वधारू लागले. तेव्हापासून सोयाबीनचे बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कायम राहिले. आता मात्र खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची आशा होती, मात्र शेतकऱ्यांच्याया आशेवर पाणी फिरल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. सध्या वाशिम जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत सोयाबीनला 6 हजार रुपये प्रतिक्विंटल ते 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे. नुकतेच केंद्र सरकारने तेलाचे दर कमी व्हावेत या अनुषंगाने तेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात केली.
यामुळे तेलाचे दर किमान दहा रुपये कमी होतील अशी तज्ञांची आशा होती. मात्र वास्तविकता याउलट आहे खाद्य तेलाचे दर कमी होण्याऐवजी अजूनच वाढत आहेत. त्यामुळे खाद्य तेलात होणारी दरवाढ ही कोणत्या कारणाने झाली असा तज्ञांना प्रश्न पडला आहे. साधारणता कुठल्याही उत्पादनावर आयात शुल्क घटवले असता त्या उत्पादनाची बाजारपेठेतील किंमत कमी होत असते. मात्र सध्या हे बाजारपेठेतील गणित उलटे पडले असून, देशात सर्वत्र सोयाबीन, तीळ, मोहरी, सूर्यफुल, पामतेलमध्ये दहा रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे.
Published on: 10 February 2022, 12:51 IST