राज्यात गत खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी ला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला होता. शासनाने देखील खरीप हंगामात ढोल ताशे वाजवत ई पीक पाहणी ही योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित केली होती, राज्य शासनाने खरीप हंगामात शेतकरी बांधवांना इ पीक पाहणी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले त्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवीत ई पीक पाहणी केली होती. परंतु रब्बी हंगामामध्ये याउलट चित्र बघायला मिळत आहे, राज्यातील बहुतेक शेतकरी ई पिक पाहणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बघायला मिळत आहे. शासनाने आतापर्यंत ई पीक पाहणी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देखील दिली आहे मात्र असे असूनही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत रब्बी हंगामात पेरल्या गेलेल्या पीकांची नोंदी करण्यास नापसंती दर्शविली आहे.
शेतकऱ्यांनी ई पिक पाहणीसाठी पाठ फिरवली आहे यासोबतच कृषी विभागाकडून देखील पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष जागृक केले नसल्याचे बघायला मिळत आहे, त्यामुळेच राज्यात सर्वत्र ई पिक पाहण्याची प्रक्रिया मंदावली आहे. ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाने ई पीक पाहणी नावाचे ॲप विकसित केले आहे हे ॲप गत खरीप हंगामामध्ये देखील उपयोगात आणले गेले होते त्यामुळे या ॲप्लिकेशनची आता शेतकरी बांधवांना चांगली माहिती झाली आहे. असे असूनही राज्यातील शेतकरी बांधवांना गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ई पीक पाहणीला अतिशय कमी प्रतिसाद दर्शविला आहे. आता ई पीक पाहणी करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, 28 तारीख ई पीक पाहणी करण्यासाठी शेवटचा दिवस ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसात होईल का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
विशेष म्हणजे रब्बी हंगामात जर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले तर ई पीक पाहणी अंतर्गत केलेल्या पिकांच्या नोंदी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. शिवाय खरीप हंगामात या ई पिक पाहणीच्या आधारावरच पिक विमा देण्यात आला होता, परंतु हे माहिती असूनही शेतकरी बांधवांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे बघायला मिळत आहे. कृषी तज्ञांच्या मते, खरीप हंगामात निसर्गाचा लहरीपणा अधिक बघायला मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ई पीक पाहणीला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला होता. परंतु रब्बी हंगामात सर्वत्र वातावरण कोरडे असते आणि खरीप हंगामाप्रमाणे पिकांचे नुकसान होत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी कडे पाठ फिरवली आहे.
याआधी शासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत ई पीक पाहणी करण्यास सांगितले होते, परंतु शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद बघता शासनाने यामध्ये मुदतवाढ करीत 28 फेब्रुवारी हा दिवस ई-पीक पाहणी करण्यासाठी शेवटचा दिवस असेल असे सांगितले. रब्बी हंगामात गेल्या दोन महिन्यापासून ई पीक पाहणीचा कार्यक्रम सुरू आहे मात्र कृषी विभागाने आतापर्यंत जनजागृती करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली नाही मात्र आता पाहणीसाठी दोन दिवस शिल्लक असताना कृषी विभाग चक्क शेतकऱ्यांना वावरात जाऊन मार्गदर्शन केल आहे. त्यामुळे शासनाची ही तत्परता आता संशयाच्या चौकटीत बघितली जातं आहे.
Published on: 26 February 2022, 03:06 IST