राज्याचे दुग्धआणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पशु संवर्धन याविषयी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या.
यामध्ये जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशन माध्यमातून राज्याकडून येणाऱ्या प्रस्तावास मंजुरी तसेच परदेशी संकरित गाई आणि बकऱ्यांच्या आयातीबाबत परवानगी मिळावी अशा पशुसंवर्धन क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर केंद्रीय मंत्री रूपाला आणि महाराष्ट्राचे मंत्री सुनील केदार यांच्यात बैठक पार पडली.ही भेट दिल्लीतील कृषी भवन येथे झाली या बैठकीत राज्यातील पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील जनावरांचा विमा संदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे.
या प्रस्तावास केंद्राकडून मंजुरी मिळावी व याबाबतचा निधी लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केदार यांनी केली तसेच राष्ट्रीय पशुधन मिशन मध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत असलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळावी. भारतीय गीर जातीच्या गाई गाईंवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधिक दुधाळ संकर तयार झालेले आहे. या नवीन संकरित गिर गाय दिवसाला 25 ते 27 लिटर दूध देते. या संकरित गिर गाई भारतात आणून शेतकऱ्यांना द्याव्यात जेणेकरून शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून असणाऱ्या दुग्ध व्यवसायात भरभराट होईल.
तसेच बकऱ्यामधील सानेन ही जात दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देते. बकऱ्या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी जेणेकरून या बकऱ्यांच्या माध्यमातून रोजगार वाढण्यासाठी मदत होईल अशी मागणी देखील सुनील केदार यांनी केली. या बकरीचे संकर नेदरलँड,ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इस्राईल येथे मोठ्या प्रमाणात आहे.
Published on: 04 February 2022, 07:49 IST