हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे एक प्रमुख पीक आहे याची पेरणी वाशीम जिल्ह्यात देखील या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात केले गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 55 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी केली जाते मात्र या रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी हरभरा पेरणी ला विशेष पसंती दर्शवल्याचे समजत आहे. या रब्बी हंगामात 65 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरला गेला आहे. म्हणजे जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर या हंगामात पेरणी वाढली आहे. सध्या जिल्हा समवेत संपूर्ण राज्यात रब्बी हंगामात हरभरा काढण्याची लगबग सुरू आहे.
अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा काढणी पूर्ण केली असून सध्या विक्रीसाठी हरभरा बाजारात दाखल होत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून, हरभऱ्याच्या बाजार भावात कमालीची घसरण बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीला बाजार भावात झालेली ही घसरण हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ शकते. सध्या बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा देखील कमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. वाशीम जिल्ह्यात तुर पिका समवेतच सर्वात जास्त हरभरा पिकाची पेरणी केली जाते. सध्या तुर पिकाला समाधान कारक बाजार भाव मिळत आहे मात्र हरभरा पिकाला अद्यापही चांगला बाजारभाव मिळत नसल्याचे समोर आले आहे.
हरभरा शेतमालाला शासनाने 5 हजार 100 असा हमीभाव गत हंगामात दिला होता, मात्र या रब्बी हंगामात पाच हजार 230 रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव शासनाने ठरवला आहे. असे असले तरी सध्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा हरभऱ्याला कमी दर मिळत आहे. हरभरा सध्या चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजारात विक्री होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनच्या बाजार भावात मोठी घट नमूद करण्यात आली होती आता सोयाबीन पाठोपाठ हरभऱ्याच्या बाजार भावात घट नमुद केली केली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमवेतच हरभरा लागवड केलेले शेतकरी देखील संकटात सापडले आहेत.
कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते तसेच हरभरा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, शासनाने मुबलक प्रमाणात डाळींची आयात करून ठेवली आहे त्यामुळे त्याचा साठा मोठ्या प्रमाणात शासन दरबारी उपलब्ध आहे. या कारणामुळे सध्या बाजारात हरभऱ्याला मागणी नसल्याचे दिसून येत आहे आणि मागणी नसल्याने साहजिकच बाजार भावात घसरण नमूद करण्यात येत आहे. सध्या मिळत असलेल्या बाजार भावात हरभरा विक्री करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे सांगितले जात आहे मात्र बाजारपेठेतले चित्र बघता भविष्यात हरभऱ्याची दरवाढ होते की नाही याचा अंदाज देखील बांधणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 01 February 2022, 10:09 IST