यंदाच्या महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन वेळा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. देशात लासलगाव बाजारपेठ मागोमाग सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे मात्र यंदाच्या वर्षी लासलगाव बाजारपेठेला मागे टाकत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रेकॉर्ड ब्रेक केले आहे. सोलापूर बाजारपेठेत एकाच दिवशी १ लाख २६ हजार क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. सोलापूर ची बाजारपेठ ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक याना जवळ आहे तसेच शेतकऱ्यांना सरासरी चांगला भाव ही मिळाला आहे. मागील महिन्यात कांद्याला सर्वात जास्त दर २६०० तर सर्वात कमी दर १३५० रुपये एवढा भेटला आहे.
आवक वाढण्याची काय आहेत कारणे?
उसाच्या पाठोपाठ नगदी पिकात कांद्याचा नंबर लागतो. शेतकऱ्यांनी जी उच्च दराची अपेक्षा लावली होती ती सोलापूरच्या बाजार समितीमधून साध्य होत आहे. बाजार समितीत इतर समितीपेक्षा जास्त दर तसेच कांद्याचा काटा झाला की लगेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे दिले जात आहेत. या धोरणामुळे पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाडा, कर्नाटक मधील शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूर च्या बाजारपेठेत येत आहेत. जास्तीत जास्त आवक वाढण्यामागे ही मुख्य कारणे आहेत.
कमी जागेत अधिकचे उत्पादन :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे जरी कांद्यावर परिणाम झाला असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांनी वेळोवेळी काळजी घेऊन कांद्याचे पीक चांगल्या प्रकारे जोपासले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन कांद्यामार्फत भेटले आहे. कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवसेंदिवस संख्या ही वाढत आहे. बाजारपेठेत होणारे अचूक आणि थेट व्यवहार व शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे बाजारपेठेत आवक वाढतच चालली आहे.
दोन वेळेस व्यवहार बंद :-
मागील दोन महिन्यात बाजारपेठेत सर्वात जास्त कांद्याची आवक झाल्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली आहे मात्र असे असताना कांद्याच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. बाजारपेठेत व्यवहार चालू असून आवक ही वाढायला सुरू झाली आहे. आता बाजारपेठ बंद ठेवली तर आंदोलन करू असे कांदा संघटनेने सांगितले आहे तसेच व्यवहार बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे असा दावा ही संघटनेने केला आहे.
Published on: 03 February 2022, 11:45 IST