खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून राज्यातील अनेक शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची लागवड करत असतात. या खरीप हंगामात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली गेली होती, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबिनच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे सोयाबीनला या हंगामात समाधान कारक बाजार भाव मिळाला. खरीप हंगामातील सोयाबीनला मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आणि उन्हाळी सोयाबीन लागवडीतून देखील दर्जेदार उत्पन्न पदरी पडणार या आशेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली आहे.
सोयाबीनचा जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा आहे. देशात देखील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनवर अवलंबित्व अधिक आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा घरगाडा हा सोयाबीनच्या उत्पादनावर चालत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवयुवकांचे गावाकडे होणारे स्थलांतर, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे घटते उत्पन्न या सर्व गोष्टींसाठी सोयाबीनची शेती एक रामबाण उपाय म्हणून कार्य करू शकतो. राज्यातील अनेक नवयुवक शेतकरी शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवत आहेत, नवनवीन पीक पद्धतींचा अवलंब करून तरुण शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न अर्जित करताहेत. राज्यातील अनेक शेतकरी सोयाबीन या नगदी पिकांची लागवड करून चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त करताना नजरेस पडत आहेत.
खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची लागवड आता उन्हाळी हंगामात देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करत आहेत. रब्बी हंगामात सोयाबीन साठी पोषक वातावरण असल्याने तसेच खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी बांधवांच्या विहिरी तुडुंब भरल्या असल्याने शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात सोयाबीन लागवडीला विशेष प्राधान्य दिले आहे. सोयाबीन पासून तयार होणाऱ्या अनेक प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे याबरोबरच सोयाबीनची पोल्ट्री व्यवसायात मोठी गरज असल्याने सोयाबीन ची मागणी सध्या बारामाही बाजारपेठेत बघायला मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेचे हे चित्र बघितले आणि आपला मोर्चा खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामात देखील सोयाबीन लागवडीकडे वळवला.
खरीप हंगामात सोयाबीनला दर ठरवण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका मोठी मोलाची होती. शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून खरीप हंगामात उच्चांकी दराने आपला सोयाबीन विक्री केला. तसेच बाजारपेठेतील सोयाबीनची बारामाही असणारी मागणी आता शेतकरी बांधवांच्या लक्षात आली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात इतर पिकांच्या लागवडी पेक्षा सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले आहे.
Published on: 31 January 2022, 01:59 IST