सध्या ऊस गळीत हंगाम सुरु असून हंगाम अर्ध्यावर आला आहे. असे असताना आष्ट्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शॉर्ट सर्किटमुळे ऊस तोडणी मशीनला आग लागली आहे, मशीन सोबत पंचवीस ते तीस एकर ऊस जळाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. श्री. दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून आष्टा परिसरात ऊस तोडणी सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली. या घटनेत संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान झाले. तसेच यावेळी परिसरातील सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीची तीव्रता इतकी जास्त होती की ही आग वीजवण्यासाठी काही करता आले नाही.
याबाबत माहिती अशी की, हाबळ वाट या परिसरात वसंतदादा कारखाना दत्त इंडिया यांच्यावतीने ऊस तोडणी सुरु होती. आष्टा परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. दुपारी दोनच्या दरम्यान राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू होती. यावेळी गोरख नामदेव शेंबडे हे चालक म्हणून काम करीत असताना ऊस तोडणी मशीन मध्ये शॉर्टसर्किट होऊन मशीनने अचानक पेट घेतला. यावेळी त्यांनी मशीनचा ताबा सोडला. यानंतर मशीन जळून खाक झाली. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती.
यामुळे सुमारे ६० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तसेच जवळच्या पंचवीस ते तीस एकरमधील ऊस देखील पेटून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यामुळे काही प्रमाणावर ऊस जळायचा वाचू शकला. मात्र मोठ्या प्रमाणात ऊस जळालाच. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. अनेकांचे ऊस तोडणीला आले होते. यामुळे मोठे नुकसान झाले.
यावेळी वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, दत्त इंडियाचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, शेती अधिकारी मोहन पवार, अनिरुद्ध पाटील, आष्टा सेंटरचे राजाराम कराडे, सुरज आवटी यांच्यासह परिसरातील शेतकरी, शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. याबाबत आता या मशीनला का आग लागली याबाबत चौकशी सुरु आहे. ऊसतोड मशीनला आग लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
Published on: 28 January 2022, 02:35 IST