नागपूर-राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. साठवण केलेला कांदा देखील खराब होत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये खराब दर्जाचा कांदा येत आहे.तसेच लाल कांद्याची आवक देखील प्रचंड प्रमाणात घसरल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत.
बाजारपेठेमध्ये नव्याने येत असलेल्या कांदा पावसामुळे ओला झाला असून त्याचा दर्जा खराब झाला आहे. जो काही चांगलं कांदा बाजारपेठेत येत आहे अशा कांद्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत आहे. चांगल्या कांद्यासाठी बाजारात 25 ते 30 रुपये किलो भाव आहे. काही विक्रेत्यांच्या मते मोठे व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात केल्याने जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र तयार केले आहे. तसेच इतर राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाने कांद्याचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे दर बऱ्यापैकी आहेत.
कांद्या सोबतच बटाट्याच्या भावातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. बटाट्याचा विचार केला तर विदर्भामध्ये पंजाबमधून बटाट्याची आवक होत असते. परंतु बटाट्याची आवक देखील मागणीच्या तुलनेत अत्यल्प असल्याने सध्या 40 रुपये किलोवर बटाटा गेला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
या झालेल्या अति पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चहुबाजूंनी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे रोपांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा साठवण करून ठेवलेला होता. तोही ओलाव्यामुळे खराब होत आहे. साठवण केलेला कांदा विकावा की राहू द्यावा या संभ्रमावस्थेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.
Published on: 01 October 2021, 09:50 IST