News

द्राक्षे पंढरी तसेच कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील देवळा आणि सटाणा तसेच दक्खनची शान दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि इगतपुरी या तालुक्यात आठ तारखेला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी गारपीट समवेतच वादळी वाऱ्याने हजेरी लावली.

Updated on 09 March, 2022 10:15 AM IST

द्राक्षे पंढरी तसेच कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अस्मानी संकटामुळे डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील देवळा आणि सटाणा तसेच दक्खनची शान दिंडोरी, निफाड, सिन्नर आणि इगतपुरी या तालुक्यात आठ तारखेला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी गारपीट समवेतच वादळी वाऱ्याने हजेरी लावली.

यामुळे परिसरातील मुख्य पीक द्राक्ष आणि कांद्याला मोठा तडाखा बसला आहे. सोमवारी देखील दिंडोरी तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यामुळे तालुक्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, अनेक द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाले असल्याचे बघायला मिळाले. जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू काढणीसाठी तयार झाला आहे. मात्र या अवकाळी आणि गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला असून कापून ठेवलेल्या हरभरा देखील निसर्गाच्या लहरीपणाचा शिकार झाला आहे. गारपिटीमुळे सटाणा देवळा तसेच जिल्ह्यातील इतर भागातील कांदा पिक मोठे प्रभावित झाली असून कांद्याची पात पडली असून यामुळे रोगराई वाढण्याचा धोका कायम झाला आहे.

आधीच खरिपात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला होता त्यातून कसाबसा सावरत तो रब्बी हंगामाकडे वळला. पोषक वातावरण असल्याने रब्बी हंगामातून खरीप हंगामाची भरपाई काढण्याचे स्वप्न बळीराजा सजवीत असतानाच निसर्गाचे हे रौद्ररूप शेतकऱ्यांचे कंबरडे मोडू पाहत आहे. सायखेडा करंजगाव चाटोरी व आजूबाजूच्या परिसरात काल झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील मुख्य पीक द्राक्ष आणि कांदा समवेतच गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. काल संध्याकाळी सात नंतर या परिसरात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर मात्र गारपीट झाल्याने सर्वात जास्त नुकसान रब्बी हंगामातील पिकांचे व द्राक्ष बागाचे झाले असल्याचे सांगितले जात आहे. 

गारपीट व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे मायबाप सरकारने तातडीने पंचनामे करत कुठल्याही प्रकारच्या अटी व शर्ती न लावता सरळ नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी यावेळी बघायला मिळत आहे. ज्या द्राक्षबागा अंतिम टप्प्यात होत्या, अशा द्राक्ष बागांचे खूप मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या द्राक्षबागात सर्वत्र द्राक्ष तुटलेले नजरेस पडले. गारपीटमुळे द्राक्ष मन्याला तडे गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे द्राक्ष बागायतदारांनी त्वरित नुकसानभरपाईची मागणी केली.

English Summary: due to haistorm nashik districts farmers are in big trouble they calling government to help
Published on: 09 March 2022, 10:15 IST