नदी म्हटले की, एक धार्मिक, भावनिक आणि आपलेपणाचे नाते एकंदरीत भारतीय संस्कृतीमध्ये तयार झाले आहे. मुख्यतः भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे एक शेतकरी आणि नदी यांचा अतूट संबंध आहे. आज जागतिक नदी दिवसाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील गिरणा नदी आणि गिरणा धरणाविषयी जाणून घेऊ.गिरणा नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. गिरणा नदी तापी नदीच्या उपनद्यापैकी एक आहे. गिरणा नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री डोंगर रांगांमध्ये दळवट या गावी झाला आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात ही नदी वाहताना पूर्वेकडे वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर उत्तरेकडे जाऊन पुढे तापी नदीला मिळते.
गिरणा नदीच्या उपनद्या
गिरणा नदीला वाहत असताना वाटेत आराम, तांबडी तसेच मालेगाव जवळ मौसम आणि पुढे पान जण या प्रमुख नद्या मिळतात. ही नदी नांदगाव तालुक्याच्या सीमेवरुन सायगाव, पिलखोड या चाळीसगाव तालुक्यातील गावांमधून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. पुढे वाहत असताना भडगाव तालुक्यात भडगाव शहराच्या पूर्वेस तिला तितुर नदी मिळते. पुढे गिरणा नदी वाहत असताना भुसावळ सुरत लोहमार्गाचे उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमकडे जाऊन अमळनेर, एरंडोल, चोपडा तालुक्याच्या सीमा जवळ तापी नदीस मिळते.
गिरणा धरण- गिरणा नदीवरील जलसिंचन प्रकल्प
गिरणा धरण ए पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. सन १९५५ मध्ये या धरण बांधकामास सुरुवात झाली. १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात हे महाकाय धरण बांधण्यात आले. गिरणा धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे धरण नाशिक जिल्ह्यात असले तरी याचा सर्वाधिक फायदा सिंचनासह आणि पिण्याच्या पाण्यासाठी जळगाव जिल्ह्याला होतो. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ किलोमीटर लांबीचा, तसेच उजवा जामदा कालवा २० किमीचा, डावा जामदा कालवा चाळीस किलोमीटरचा आहे. या कालव्यामुळे गिरणा खोऱ्यातील बहुतांश गावे सुपीकता त्याच्या व समृद्धतेच्या दृष्टीने संपन्न झाली आहेत.
गिरणा नदीवरील या धरणाचा फायदा चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ गावात पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्त्रोत आहे. जळगाव जिल्ह्याच्या बहुतांश भागातील लोकांची तहान भागवण्याचे काम या प्रकल्पामुळे पूर्ण झाले आहे. गिरणा धरणाची पाणी साठवण क्षमता २१५० कोटी घनफूट आहे. या धरणाचा विस्तार जवळ-जवळ १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात झाला आहे. जवळ-जवळ १ लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवळ प्रदान केली आहे. गिरणा धरणावरील कालव्यांमुळे 2 लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २२ टीएमसी आहे.
Published on: 27 September 2020, 01:37 IST