News

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा विक्रीची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील कांदा व्यापारी मे. नाज आलु कंपनीला उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता.

Updated on 16 February, 2019 8:33 AM IST


मुंबई:
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा विक्रीची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील कांदा व्यापारी मे. नाज आलु कंपनीला उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता.

बागलाण (जि. नाशिक) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ‘आर. एल. ट्रेडींग कंपनी’चे आडतदार अकील शेख यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याची चक्रपूर बाजार समिती (कानपूर) येथील नाज आलु कंपनीला विक्री केली होती. नाज आलु कंपनीने कांदा विक्रीची रक्कम थकविल्यामुळे आडतदार अकील शेख हे येथील शेतकऱ्यांना पैसे अदा करु शकले नाहीत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी श्री. खोत यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी  केली  होती.

श्री. खोत यांनी उत्तर प्रदेश सरकारला पत्र देऊन महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांची थकीत रक्कम मिळावी यासाठी तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार तेथील कृषी, पणन आणि कृषी परदेश व्यापार विभागाने नाज आलु कंपनीला तात्काळ ही रक्कम अदा करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यावर नाज कंपनीने 1 कोटी 37 लाख 51 हजार रुपयांपैकी 1 कोटी 28 लाख 81 हजार रुपये महाराष्ट्रातील कंपनीला अदा केले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच अदा करण्याबाबतही नाज कंपनीला निर्देश दिले आहेत, असे उत्तर प्रदेश सरकारने कळविले आहे.

English Summary: Due amount of Onion get early to Nashik Farmers
Published on: 16 February 2019, 08:13 IST