कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्यात येणार असून राज्यात 'ड्रोन मिशन' राबवणार असल्याची घोषणाही धनंजय मुंडे यांनी केली.राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायातीत ही यंत्रे बसवण्यात येतील. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
हे पर्जन्यमापन यंत्र बसवल्यानंतर याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल असेही धनंजय मुंडे म्हणाले. त्यासोबतच नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली. ते म्हणाले की, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवरायांचे शेतकरी धोरण याला अनुसरुन दोन्ही हातांनी शेतकऱ्यांसाठी काम करणारे आहे.
त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार असून यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच राज्यात 'ड्रोन मिशन' राबवणार असून त्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
Published on: 20 December 2023, 06:23 IST