राज्यात आजपासून उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगावमध्ये देशातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या अमफ चक्रवादळाची तीव्रता वाढत असल्याने उत्तर व वायेव्यकडून कोरडे वारे मध्य भारतातकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भात मंगळवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
काल अकोला येथे ४४.२ आणि वर्धा येथे ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमान चाळशीपार गेले आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या अमफन चक्रिवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळाली आहे. रविवारी मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला आहे. या भागात ढगांची दाटी झाली असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवापर्यंतच्या तासांत अंदमान बेटाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन दिर्घकाली सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २२ मे पर्यंत अंदमान -निकोबार बेटावर दाखल होत बहुतांश भाग व्यापण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री उशिरा अमफन चक्रीवादळीची निर्मिती झाली आहे. ओडिशाच्या परादीपपासून ९९० किलोमीटर आणि पश्चिम बंगालच्या दिघापासून ११४० किलोमीटर दक्षिणेकडे असलेले वादळी प्रणालीचे केंद्र ताशी सहा किलोमीटर वेगाने सरकत आहे. येत्या १२ तासात चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही हे चक्रीवादळ थैमान घालू शकते. देशात वेस्टर्न डिस्टर्बेंस सक्रिय आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तरी राजस्थान आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातही हवामान खराब होण्याची शक्यता आहे.
Published on: 18 May 2020, 12:43 IST