शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन करत असतो. गुरांना हिरव्या चाऱ्याची गरज भासते जे की त्यामुळे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रकारे निघते. गुरांना बारमाही हिरवा चारा पुरवणे त्यावेळी शक्य होते जेव्हा आपण पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करू. नेपियर गवत हे बहूवर्षीय गवत असल्यामुळे एकदा तुम्ही याची लागवड केली की त्यानंतर दोन ते तीन वर्ष हे गवत येतच राहते त्यामुळे गाई गुरांना हिरवा चारा भेटतच असतो. पशुपालन व्यवसायात जवळपास ६० टक्के खर्च हा आहारावर राहिलेला असतो त्यासाठी जर तुम्ही योग्य प्रकारे व्यवस्थापन केले तर तुम्हाला फायदा होईल आणि खर्च ही जाणार नाही.
नेपियर गवताची पूर्वमशागत :-
जमिनीची खोल नांगरणी तसेच २ ते ३ वेळ वखरणी करून योग्य प्रकारे जमीन तयार करून घ्यावी. नेपियर गवताची लागवड करण्यापूर्वी उभ्या तसेच आडव्या पद्धतीने नांगरणी करून घ्यावी व दोन ते तीन वेळा कुळवाच्या पाळ्या करून जमीन भुसभुशीत करावी. जेव्हा शेवटची कुळवाची पाळी असेल त्यावेळी जमिनीत चांगल्या पद्धतीने शेणखत टाकावे. नेपियर पिकाचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये याची लागवड करावी. तुम्ही खत व पाणी योग्य वेळेवर दिले तर सुमारे ३ वर्ष हे पीक टिकून राहते.
लागवड पद्धती :-
१. सुपर नेपियर या गवताची कांडी ४ फूट बाय 2 फूट व लावावी. त्यामुळे आपणास उत्पादन चांगले मिळते, ४ फुटाचे अंतर ठेवले की आंतरमशागत करण्यास तसेच पाणी देण्यास सोयीस्कर राहते.
२. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट तर उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या गवताची कांडी लावली की ती चांगल्या प्रकारे फुटते.
३. नेपियर कांडी ची लागवड करतेवेळी प्रथम माती परीक्षण करावे व त्यानंतर ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश अशा प्रकारे खत द्यावे.
४. गवत वाढायला सुरू झाले की सुरवातीस दोन ते तीन वेळा खुरपण्या कराव्या आणि नंतर आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.
५. फेब्रुवारी व मार्च दरम्यान तुम्ही लागवड केली की सुरुवातीला दोन दिवसाने व नंतर आठ दिवसाने पाणी द्यावे.
६. लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी या गवताची कापणी करावी मात्र जमिनीपासून १५ ते २० सेमी अंतरावर कापणी करावी म्हणजे पुढील कापण्या ६-८ आठवड्याच्या गॅपनुसार करता येतील.
७. नेपियर गवताच्या योग्य वाढीसाठी उष्ण कटिबंधीय हवामान असणे गरजेचे असते.
हत्ती गवत म्हणून ओळखले जाते :-
वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता राहावी म्हणून अशा प्रकारे पूर्व व्यवस्थापन करावे. पूर्वी या गवताला हत्ती गवत म्हणून ओळखले जात होते. हे गवत उंची आणि जास्त फुटवे दिल्यामुळे नावाजले होते. नेपियर गवत हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे तुम्ही एकदा या गवताची लागवड केली की दोन ते तीन वर्षे ते कुठेच हालत नाही.
Published on: 20 January 2022, 07:50 IST