News

अमरावती : यंदा पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या. बँकांना देण्यात आलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या. परंतु अमरावती जिल्हा मात्र याला थोडासा अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे.

Updated on 23 October, 2020 10:59 AM IST


अमरावती : यंदा पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या. बँकांना देण्यात आलेले लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या. परंतु अमरावती जिल्हा मात्र याला थोडासा अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे. कारण या जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचा आकडा वाढला असून गेल्या पाच वर्षाच्या तुलनेने अधिक आहे. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व विविध प्रयत्नांमुळे जिल्ह्यात खरीप कर्ज वितरणाची टक्केवारी वाढून आता हे प्रमाण ६२ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत पाच वर्षांतील खरीप कर्ज वितरणात हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत १ लाख २३ हजार ६८१ शेतकरी बांधवांना खरीप कर्ज वितरित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 

कोरोना संकटकाळात विविध क्षेत्रांपुढे नवनवी आव्हाने उभी राहिली. ग्रामीण कृषी अर्थकारणातही अनेक अडचणी उभ्या राहिल्या. या काळात विविध अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न होत असतानाच शेतकरी बांधवांना खरीपाचे कर्ज वाटप सुरळीत व्हावे,या हेतूने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. कर्जमुक्ती योजनेत १ लाख १० हजार ७७४ खात्यांना योजनेचा सुमारे ७९९ कोटी ७८ लक्ष रूपये निधीचा लाभ देण्यात आला. खरीप कर्जवाटप प्रक्रियेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा समावेश होण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी विविध बैठकांद्वारे निर्देश दिले व सातत्याने पाठपुरावा केला. यंदाच्या खरीप हंगामासाठी १७२० कोटी रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते.  त्यानुसार १हजार ७३ कोटी ९४ लाख  कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यानुसार हे प्रमाण ६२टक्क्यांवर गेले असून, गत पाच वर्षातील ही सर्वाधिक कर्जवाटपाची रक्कम आहे. रब्बी पीक कर्ज वितरणालाही गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 


यंदाच्या खरीप कर्जवाटपात अलाहाबाद बँकेकडून १०कोटी ८२लाख, आंध्र बँकेकडून १ कोटी, बँक ऑफ बडोदाकडून २७कोटी ४ लाख, बँक ऑफ इंडियाकडून २० कोटी ५९ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रकडून २०९ कोटी ३५ लाख, कॅनरा बँकेकडून ७कोटी १० लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून १४८ कोटी ४९ लाख, कॉर्पोरेशन बँकेकडून १५ लाख, इंडियन बँकेकडून ९कोटी ५१ लाख, इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ४कोटी २२ लाख , पंजाब नॅशनल बँकेकडून १० कोटी २० लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून १८४ कोटी ४६ लाख, युको बँकेकडून ३कोटी २१ लाख, युनियन बँक ऑफ इंडियाकडून ४० कोटी ५६ लाख, ॲक्सिस बँकेकडून १० कोटी, आयडीबीआय बँकेकडून ३ कोटी ३१ लाख, एचडीएफसी बँकेकडून १८ कोटी २२ लाख, आयसीआयसीआयकडून ४कोटी २५ लाख, रत्नाकर बँकेकडून २० लाख, इंडसइंड बँकेकडून २५लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून १६ कोटी ५५ लाख, जिल्हा बँकेकडून ३४४ कोटी ४६ लाख असे एकूण १हजार ७३ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व जिल्हा प्रशासन व बँकांचा सातत्यपूर्ण समन्वय, तसेच  विविध प्रयत्नांमुळे कर्जवितरणाची टक्केवारी वाढल्याचे ते म्हणाले.

English Summary: Distribution of 62% kharif crop loan in Amravati district - Adv. Yashomati Thakur
Published on: 22 October 2020, 12:11 IST